Paud Kolvan : पौड कोळवण रस्त्यालगत उघड्यावर वैद्यकीय कचऱ्याचा ढीग; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Paud Kolvan : स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करत संबंधित जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.

Paud Kolvan : पौड कोळवण रस्त्यालगत उघड्यावर मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. इंजेक्शनच्या सुया, सिरिंज, औषधांच्या बाटल्या आणि इतर वैद्यकीय साहित्याचा मोठा ढिग रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला असून यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सदर कचऱ्यात वापरलेल्या सुई व सिरिंज असल्याने संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका अधिक आहे. परिसरात फिरणाऱ्या भटक्या जनावरांमुळे आणि शाळेसाठी चालत रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या लहान मुलांच्या वावरामुळे ही परिस्थिती आणखी धोकादायक ठरत आहे.
नियमांनुसार वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना अशा प्रकारे उघड्यावर कचरा टाकला जाणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक मानले जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत संबंधित जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच तात्काळ हा कचरा सुरक्षितरीत्या हटवून परिसर स्वच्छ करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
हेही वाचा:





