पिंपरी | टाकवे पूल पाण्याखाली, आंदर मावळचा संपर्क तुटला

कान्हे, (वार्ताहर) – आंदर मावळ विभागाला जोडणारा कान्हे ते टाकवे गाव दरम्यानचा पूल पाण्याखाली गेल्याने आंदर मावळ विभागातील अनेक गावांचा संपूर्क तुटला आहे. गुरूवारी आंदर मावळ विभागाला जोरदार पावसाने झोडपून काढले. यात इंद्रायणी नदीने आपले रौद्र रूप दाखविल्याने टाकवे गावाजवळील पुलावरून पाणी गेले. त्यामुळे आंदर मावळातील गावांतील नागरिकांचा प्रवास थांबला आणि संपर्क तुटला.
या ठिकाणी नवीन पुलाचे काम चालू असून तो पूल अद्याप वाहतूकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे जुणा पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांची गैरसोय झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
आंदर मावळातील जवळपास ४० ते ५० गावांचा संपर्क तुटला आहे. पाऊस ओसरल्यानंतर पुलावरील पाणी ओसरल्यानंतर दळणवळण सुरू होईल. मात्र पाऊस कमी झाला नाही तर ही स्थिती कायम राहू शकते. येथील नागरिकांनी काळजी घ्यावी. सुरक्षितरित्या घरात रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





