पिंपरी | परतीच्या पावसामुळे भात उत्पादक अडचणीत

कान्हे, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात गेल्या तीन चार दिवसापासून सातत्याने परतीच्या पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील नाणे मावळ, आंदर मावळ तसेच कान्हे, नायगाव परिसरातील शेतकरी चिंतेत आहे.
सततच्या परतीच्या पावसामुळे तयार झालेले, हातातोंडाशी आलेले भात पीक नुकसानग्रस्त होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.
कापणीला आलेले भाताचे पीक या परतीच्या पावसामुळे पाण्यात जाइल की काय? अशी भीती सध्या परिसरातील शेतकऱ्यांना आहे. या आपत्तीपासून पीक वाचावे, अशी प्रार्थना सध्या बळीराजा करीत आहे.
यंदा तालुक्यात पोषक वातावरणामुळे आणि समाधानकारक मान्सून पाऊस झाल्याने भाताचे पीक चांगले आले. जवळपास सर्वच विभागात भात पीक काढणीला आले आहे.
येत्या चार पाच दिवसात भात पीक कापणी सुरू होणार, अशी चिन्हे असतानाच परतीच्या पावसाचा फेरा मावळावर आला आहे.
गेली आठवडाभरापासून परतीचा पाऊस तालुक्यात हजेरी लावीत आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून दररोज सायंकाळी तो बरसत आहे. अशा परिस्थितीत भात पीक कसे कापावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
आधी करपा रोगाचा प्रादुर्भाव –
गेल्या महिन्यात भातावर करपा, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यात भात पिकाचे उत्पादन घटेल, अशी भीती शेतकऱ्यांना होती. अशात परतीच्या पावसाचे नवे संकट ओढावले आहे.
खर्चाचा मेळ बसेना –
निसर्गाच्या अनियमितपणामुळे शेतीचे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा मेळ बसेना झालाय. बी बीयाणे, खते आणि मजूरी यांच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना अगोदरच भातशेती परवडेनासी झाली आहे. त्यात आता परतीच्या पावसाचा दणका शेतकऱ्यांना बसतोय.
मावळात शेतकरी मोठ्या कष्टाने भाताची शेती करीत असतो. यंदा भात पीक चांगले आले होते. मात्र त्यावर काही ठिकाणी करपा रोग पडला.
तर आता परतीचा पाऊस सतत कोसळत आहे. यामुळे भाताच्या शेतात पाणी साठून राहत असून त्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे. भाताची कापणी देखील यामुळे करता येत नाही. – सोमनाथ येवले, शेतकरी, नायगाव





