कोणत्याही नात्यात ‘सॉरी’ बोलणे का आहे फायदेशीर? संवादाचा पूल जोडणारा हा शब्द ठरतो महत्त्वाचा

कोणत्याही नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी असेल तर नाते दीर्घकाळ टिकते. नात्यात एकमेकांचा आदर करणे, एकमेकांना वेळ देणे खूप जास्त गरजेचे आहे. अनेकदा नात्यात जोडीदार दुखावतो. आपल्या चुकीच्या वागण्यामुळे किंवा बोलण्यामुळे जोडीदाराला खूप त्रास होतो, अशावेळी त्यांना माफी मागणे गरजेचे असते.
माफी मागणे वा न मागणे यामागची मानसिकता वेगळीच असते. आपण माफी मागितल्यास घटनेची जबाबदारी आपल्यावरच येते व समोरची व्यक्ती मुक्त होते, या भावनेतून ते माफी मागणे टाळतात. वेळप्रसंगी राग, चिडचीड, कुरबूर, भावनिक दुरावा त्यांना चालतो. पण माफी मागितल्याने सामोरे जावे लागणाऱ्या आपल्यातल्या कमतरता, दुर्बलता व चुकांचा सामना करणे त्यांना कठीण वाटते.
आजच्या धावपळीच्या जगात कुणालाही कुणासाठी वेळ नाही. आपल्याकडून नकळत कुणी दुखावलं गेलं, तरी आपल्याला त्याची जाणीव असतेच असे नाही. त्यामुळे आपण सॉरी म्हणण्याची कलाही अवगत करायला हवी. स्वतःचा इगो किंवा अती आत्मविश्वास प्रसंगी बाजूला ठेवत, कुठल्याही नात्यात अशी सहज आणि मनापासून माफी मागता यायला हवी.
तसं झालं, तर तुमच्या मैत्रीचा पायाही पक्का असल्याची जाणीव समोरच्याला होईल आणि तुमचे नातेही दृढ होईल. अनेकदा मेंदू माफी मागण्यापासून रोखतो. मात्र, मनापासून मागितलेली माफी नाते जिवंत करते. तणाव कमी करते व मानसिक आरोग्य सुधारते. माफी मागणारे रक्तदाब व हृदयगतीमध्ये सुधार झाल्याची अनुभूती घेतात. संवादाचा पूल पुन्हा जोडणारा हा शब्द म्हणूनच महत्त्वाचा ठरतो.
‘सॉरी’ या एकाच शब्दानं नात्यातला तणाव दूर होऊ शकतो
– सॉरी म्हणणं अवघड जात असेल, तर थोडा वेळ घ्या आणि मग कोणत्या प्रकारे सॉरी म्हणायचं हे ठरवा.
– इतरांच्या चुका आपण सहज बोलून दाखवतो, मात्र आपली चूकही आपण तितक्याच स्पष्टपणे बोलायला हवी.
– छानशी फुलं देऊन, चॉकलेट देऊन, ई-मेलवर एखादी सुंदर कविता किंवा फोटो पाठवूनही तुम्ही सॉरी म्हणू शकता.
– प्रत्येक नात्याचा पाया हा तुमच्या संवादावर अवलंबून असतो. तुमचा संवाद खुंटला असेल, तर सॉरी हा एकच शब्द पुन्हा संवादाचा पूल बांधू शकतो.
– अनेकजण सॉरी या शब्दापासूनच दूर पळतात. स्वतःची चूक मान्य करण्यात काहीही कमीपणा नसतो. म्हणूनच आधी चूक मान्य करण्याची सवय लावून घ्या.
– सॉरी म्हणणे म्हणजे कमीपणा घेणे किंवा समोरच्या व्यक्तीसमोर झुकणे असा समज कधीच नसावा. सॉरी म्हटल्याने आपली, आपल्या विचारांची, भावनांची किंमत समोरच्याला आहे, हे दुखावलेल्या व्यक्तीला कळते.





