T20 Mumbai League : पृथ्वी शॉचं जबरदस्त कमबॅक! तुफान फटकेबाजीच्या जोरावर ३४ चेंडूत पाडला तब्बल ‘इतक्या’ धावांचा पाऊस

T20 Mumbai League Updates Prithvi Shaw’s Explosive 75 off 34 Balls : गेल्या काही काळापासून पृथ्वी शॉ चर्चेत नव्हता, पण आता त्याने टी-२० मुंबई लीगमध्ये तुफानी खेळी करत सर्वांना थक्क केलं आहे. या लीगमध्ये त्याच्या बॅटने अक्षरशः आग ओकली आहे. नॉर्थ मुंबई पँथर्सकडून खेळताना पृथ्वी शॉने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. त्याने २२० च्या स्ट्राईक रेटने तुफानी फटकेबाजी करताना ३४ चेंडूत ७५ धावांचा पाऊस पाडला. यादरम्याने त्याने केवळ २३ चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं.
पृथ्वी शॉचं दमदार कमबॅक –
गेल्या काही काळापासून पृथ्वी शॉ खराब फलंदाजी आणि चुकीच्या सवयींमुळे सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता. त्यातच आयपीएल २०२५ मध्येही त्याला स्थान मिळवण्यात अपयश आलं. पण आता या प्रतिभावान खेळाडूची बॅट पुन्हा एकदा धावांची आग ओकू लागली आहे. पृथ्वी शॉने ट्रायन्स नाइट्सविरुद्ध शानदार फलंदाजी करत ३४ चेंडूंमध्ये ७५ धावांची खणखणीत खेळी साकारली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. एकूणच, नॉर्थ मुंबई पँथर्ससाठी पृथ्वी शॉने २२० च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने फलंदाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
पृथ्वी शॉने जैस्वालसोबत दुसऱ्या विकेटसाठी साकारली अर्धशतकी भागीदारी –
50 off 23 balls for Prithvi Shaw in T20 Mumbai! pic.twitter.com/YICUUejncn
— CriCRavI (@cricravi82) June 8, 2025
पृथ्वी शॉने अर्जुन जैस्वालसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. याच कारणामुळे हर्षल जाधवने शॉसोबत मिळून आक्रमक शैलीत ३० धावांची भर घातली. पृथ्वी शॉच्या खेळीचा विचार केला तर, त्याने ७५ धावांची खेळी करताना सुरुवातीच्या १० चेंडूंमध्ये सावध खेळ केला. या वेळी त्याची धावसंख्या फक्त १४ धावा होती. पण त्यानंतर त्याच्या खेळीने वेग पकडला आणि त्याने तुफान फटकेबाजी केली.
हेही वाचा – Khalil Ahmed : खलील अहमदच्या घातक गोलंदाजीचा कहर, यजमान इंग्लंड लायन्सला तिसऱ्या दिवशी फोडला घाम
पृथ्वीने एका षटकात पाडला २६ धावांचा पाऊस –
पृथ्वी शॉने १० चेंडूंनंतर मैदानावर चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्याने मिनाद मांजरेकरच्या ५व्या षटकात तब्बल २६ धावांचा पाऊस पाडला. या षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर पृथ्वीने चौकार लगावले. तिसऱ्या चेंडूवर त्याने दणदणीत षटकार ठोकला. त्यानंतर, षटकातील शेवटच्या तीन चेंडूंवर पृथ्वीने चौकारांची हॅटट्रिक साजरी करत मांजरेकरची चांगलीच धुलाई केली. अशा प्रकारे, पृथ्वी शॉने एका षटकात २६ धावांचा पाऊस पाडला. दरम्यान या सामन्यात शॉच्या संघाने सूर्याच्या संघावर ३८ धावांनी मात केली.





