दुबई – आयसीसीने यंदा होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या बक्षिसांची घोषणा केली आहे. या स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा संघ 12 कोटी रुपयांचा मानकरी ठरणार आहे तर, उपविजेत्या संघाला 6 कोटी रुपये मिळतील. याच बरोबर आयसीसीने या पुरस्कारांच्या संपूर्ण रचनेलाही प्रसिद्ध दिली आहे. येत्या 17 ऑक्टोबरपासून ही स्पर्धा अमिराती व ओमानमध्ये सुरु होत आहे. सुरुवातीला पात्रता सामने खेळवले जातील. त्यात आठ संघ असून प्रत्येक गटात 4 संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर 12 फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर 12 फेरीत 6 संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. सुपर 12 फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेते 14 नोव्हेंबर रोजी विजेतेपदासाठी अंतिम लढत खेळतील. विजेत्या संघाला 12 कोटी रुपये मिळतील, तर उपविजेत्या संघाला 6 कोटी तर, उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी 3 कोटी मिळणार आहेत. या स्पर्धेत एकूण 5.6 मिलियन डॉलर बक्षीस रक्कमेचे सहभागी 16 संघांमध्ये वाटप केले जाणार आहे. सुपर 12 मध्ये प्रत्येक सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाला बोनस रक्कमही दिली जाणार आहे. 2016 सालानंतर प्रथमच टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. सुपर 12 गटात एकूण 30 सामने होणार आहेत. या गटात एकूण 12 लाख डॉलर रक्कम दिली जाणार आहे. सुपर 12 गटामधून बाहेर जाणाऱ्या संघाला प्रत्येकी 70 हजार डॉलर मिळतील. पात्रता फेरीतील संघ गट 1 – श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅंड, नामिबिया गट 2 – बांगलादेश, स्कॉटलंड, पपुआ न्यू गिनी, ओमान सुपर 12 फेरीतील संघ गट 1 – ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, गट एकचा विजेता आणि गट दोनचा उपविजेता. गट 2- भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट एकचा उपवजेता आणि गट दोनचा विजेता.