देशाची टीम पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार? जय शहा, तुमचा कोण लागून गेला? – उद्धव ठाकरेंचा सवाल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य शिक्षक सेनेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकार, पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामन्यांचा प्रस्ताव आणि देशातील सैनिकांचे श्रेय लाटण्याचा भाजपचा प्रयत्न यावर सडेतोड टीका केली. “प्रामाणिक निवडणूक झाली तर भाजप महाराष्ट्र जिंकू शकत नाही”, असे
उद्धव ठाकरे यांनी भाजपवर मत चोरीचा आरोप करत म्हटले आहे. प्रामाणिक निवडणूक घेतली तर भाजपला महाराष्ट्रात विजय मिळणार नाही. “हे सगळं बोगस आहे. राहुल गांधी यांनी या ढोंगीपणाचे पितळ उघडे पाडले आहे,” असे ते म्हणाले.
“पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार का?”
पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळण्यावर ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. “कबुतर, कुत्रे, हत्ती यांच्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात, पण माणुसकी कुठे जाते? गरम सिंदूर वाहत असल्याचे बोलता आणि आता देशाची टीम पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणार? जय शहा, तुमचा कोण लागून गेला? क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का?” अशी खरमरीत विचारणा त्यांनी केली.
“सैनिकांचे शौर्य आणि भाजपचा ढोंगीपणा”
देशाच्या सैनिकांनी दाखवलेल्या शौर्याचे श्रेय भाजप स्वतःकडे घेत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. “सोफिया कुरेशी या सैन्य अधिकाऱ्याला दहशतवाद्यांची बहीण म्हणणारे भाजपचे गधडे आहेत. जगभरात आपले शिष्टमंडळ फिरले, पण एकही देश आपल्या बाजूने उभा राहिला का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“शिक्षणाचा अभाव आणि घुसखोरी”
रशिया-अफगाणिस्तान युद्धादरम्यान ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकण्याचा दाखला देत ठाकरे यांनी भाजपच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानबरोबर चीनही होता. मग पाकिस्तान आणि चीनचा निषेध करायचा का? हे न शिकल्याचा परिणाम आहे. यांना चांगले शिक्षक मिळाले असते तर?” असा टोला त्यांनी लगावला.





