Swine flu: स्वाइन फ्लूचा विळखा; महिनाभरात २३ रुग्ण पॉझिटिव्ह
Swine flu: दिलासादायक म्हणजे स्वाइन फ्लूमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही

पिंपरी – शहरात स्वाइन फ्लूचा संसर्ग वाढत असून, ऑगस्ट महिन्यातच तब्बल २३ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात स्वाइन फ्लूचे एकूण २९ रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे या कालावधीत स्वाइन फ्लूमुळे मृत्यूची नोंद झालेली नाही.
महापालिका वैद्यकीय विभागाच्या आकडेवारीनुसार, जानेवारीमध्ये एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर फेब्रुवारी ते जून या पाच महिन्यांत एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. जुलैमध्ये स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण आढळले.
ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होत २३ जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली. स्वाइन फ्लू हा श्वसनमार्गाशी संबंधित संसर्गजन्य आजार असून, एच १ एन १ विषाणूमुळे त्याची लागण होते.
शहरात रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, खोकताना-शिंकताना नाक-तोंड झाकणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घेणे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लक्षणे –
- अचानक तीव्र ताप आणि थंडी वाजणे
- घसा खवखवणे किंवा घसादुखी
- सतत खोकला आणि नाक वाहणे किंवा नाक बंद होणे
- अंगदुखी आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना
- डोकेदुखी आणि प्रचंड थकवा जाणवणे
- काही रुग्णांमध्ये मळमळ, उलट्या किंवा अतिसार होऊ शकतो
- काही रुग्णांमध्ये न्यूमोनियासाखी देखील लक्षणे
Pune District : डिंभे-माणिकडोह बोगद्याला विरोध कायम – दिलीप वळसे पाटील





