Pune District : डिंभे-माणिकडोह बोगद्याला विरोध कायम – दिलीप वळसे पाटील
Pune District :या बोगद्याला विरोध कायम असल्याची ठाम भूमिका माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे.

मंचर : आंबेगाव तालुक्यातील डिंभे-माणिकडोह बोगद्याला विरोध कायम असून शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. बोगद्याला विरोधासाठी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. असा इशारा देणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे मंगळवारी देण्यात आले. अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
कुकडी प्रकल्पाच्या ५ हजार ७०४ कोटी ५० लाख रुपयांच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये डिंभे-माणिकडोह बोगद्याचा समावेश करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या बोगद्याला विरोध कायम असल्याची ठाम भूमिका माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती मिळताच वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन बोगद्यामुळे या परिसरातील शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका मांडली. तसेच १८ जुलै २०२४ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत डिंभे-माणिकडोह बोगदा न करण्याबाबत दिलेल्या आश्वासनाचीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली.
यावेळी वळसे पाटील यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये आवश्यक बदल करण्याची मागणी करत निवेदन मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष दिले. मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत निर्णयामध्ये बदल करण्याचे तसेच आंबेगाव, शिरूर व जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ न देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.
डिंभे-माणिकडोह बोगद्यामुळे आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या हक्कावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बोगद्याला आमचा ठाम विरोध असून, शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही.
– दिलीप वळसे-पाटील, माजी गृहमंत्री.





