Gas cylinder : ग्रामीण भागात गॅस सिलिंडरसाठी मोठी प्रतीक्षा; शहरी ग्राहकांना लगेच मिळतो, ग्रामीण भागासोबत भेदभाव का?
Gas cylinder : वितरण व्यवस्था सुधारण्याची मागणी

कान्हे – मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ग्रामीण भागात सिलिंडर बुक केल्यानंतर अनेक दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना गॅस वितरणाच्या सेवेत असा फरक का, असा सवाल मावळातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
घरगुती स्वयंपाकासाठी ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे पूर्णपणे गॅस सिलिंडरवर अवलंबून आहेत. त्यामुळे सिलिंडर संपल्यानंतर नवीन सिलिंडरची वेळेत उपलब्धता होणे आवश्यक आहे.
मात्र बुकिंग केल्यानंतरही अनेक दिवस पुरवठा होत नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सिलिंडर संपल्यानंतर बुकिंग केले जाते. मात्र नवीन सिलिंडर मिळण्यासाठी मोठा कालावधी लागत आहे. त्यामुळे घरातील स्वयंपाकाचे नियोजन कोलमडते.
ग्रामीण भागात पर्यायी इंधनाचे पर्यायही मर्यादित आहेत. पूर्वी अनेक गावांमध्ये सरपण किंवा लाकूड सहज उपलब्ध होत होते. मात्र वाढते शहरीकरण आणि जंगलतोडीमुळे सरपण मिळणेही कठीण झाले आहे.
पावसाळ्यात ओले लाकूड असल्याने त्याचा वापर करणेही अवघड होते. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर हा ग्रामीण कुटुंबांसाठी अत्यावश्यक इंधनाचा स्रोत बनला आहे. अशा परिस्थितीत सिलिंडरच्या पुरवठ्यासाठी बरेच दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्यास नागरिकांनी पर्याय काय निवडायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दर समान, मात्र पुरवठ्यात फरक
ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांकडून गॅस सिलिंडरसाठी पैसे घेताना कोणताही वेगळा दर आकारला जात नाही. मग सेवा देताना ग्रामीण ग्राहकांना अधिक प्रतीक्षा का करावी लागते, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहरातील ग्राहकांना गॅस सिलिंडर वेळेवर मिळतो. मग ग्रामीण भागातील ग्राहकांना ४५ दिवस का थांबावे लागते?
आम्ही ग्रामीण भागात राहतो म्हणून आमच्यासाठी सेवा कमी दर्जाची असावी का? असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे. गॅस बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना अपेक्षित वितरणाची तारीख किंवा विलंबाचे कारण स्पष्टपणे कळविण्याची मागणीही होत आहे.
शेगडी पेटवायची तरी कशी?
ग्रामीण भागातील नागरिकांसमोर गॅसच्या विलंबामुळे पर्यायी इंधनाचा प्रश्नही उभा राहत आहे. इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय निवडल्यास काही गावांमध्ये वीजपुरवठ्याचा लपंडाव असतो. दुसरीकडे लाकडाचा वापर करायचा झाल्यास पावसाळ्यात कोरडे लाकूड उपलब्ध होत नाही. गॅस बुकिंग केल्यानंतर वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने घरातील स्वयंपाकाचे नियोजन कोलमडते.
इलेक्ट्रिक शेगडी वापरायला गेलो तर विजेचा लपंडाव असतो. त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. संबंधित गॅस एजन्सीने ग्रामीण भागातील वितरण व्यवस्था सुधारून ठराविक कालावधीत सिलिंडर उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी विजय कदम यांनी केली आहे.
शहरीसदृश परिसरातही ग्रामीण भागासारख्याच सुविधा
कामशेत परिसरात औद्योगिक वसाहती तसेच शहरीकरणाचा वेग वाढत आहे. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वस्ती वाढली आहे. मात्र प्रशासकीय कागदोपत्री हा परिसर अद्याप ग्रामीण भागात मोडतो.
त्यामुळे शहरासारखी लोकसंख्या आणि गरजा वाढत असताना ग्रामीण भागातील वितरण व्यवस्थेच्या मर्यादा नागरिकांना सहन कराव्या लागत असल्याची भावना आहे. त्यामुळे प्रशासनाने चौकशी करून सर्वांना समान सेवा मिळेल, याची व्यवस्था करावी, असे बंटी मोदी यांनी सांगितले.
डिजिटल युगातही इंधनासाठी धावपळ
कान्हे परिसरात औद्योगिक कंपन्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकसंख्याही वाढत आहे. मात्र घरातील स्वयंपाकासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत इंधनाच्या पुरवठ्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
आपण डिजिटल युगात पोहोचलो असलो, तरी घरातील मूलभूत स्वयंपाकाच्या इंधनासाठी अशी धावपळ करावी लागणे ही चिंतेची बाब आसल्याची भावना प्रमोदिनी टपाले यांनी व्यक्त केली.
‘आम्ही नोकरीसाठी सकाळी लवकर घराबाहेर पडतो आणि संध्याकाळी उशिरा घरी येतो. इलेक्ट्रिक शेगडीचा पर्याय निवडला तर विजेचा लपंडाव ही समस्या समोर येते. त्यामुळे वेळेवर स्वयंपाक करणे कठीण होते. ग्रामीण भागाला ४५ दिवसांनंतर सिलिंडर मिळत असेल तर ही समस्या गंभीर आहे.’ – सुनील चोपडे, नागरिक
‘पूर्वी गावात लाकूड सहज उपलब्ध व्हायचे. आता परिस्थिती बदलली आहे. वाढते शहरीकरण आणि जंगलतोडीमुळे सरपण सहज मिळत नाही. त्यामुळे गॅस संपल्यावर मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.’ – ऋषीनाथ आगळमे, नागरिक, साते





