Swimming Pool Death: हृदयद्रावक! पोहायला गेलेल्या १३ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ.
Swimming Pool Death: जलतरण तलावात गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोरेगाव मुळ येथील स्विमिंग टँक येथे दुपारी घडली.
Swimming Pool Death – पोहण्याचा सराव करण्यासाठी जलतरण तलावात गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कोरेगाव मुळ (ता. हवेली) येथील स्वामी समर्थ स्विमिंग टँक येथे बुधवारी (दि. 10) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जलतरण तलावातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मृत मुलाचे नाव यश महेश गायकवाड (वय 13, रा. हिंगणगाव, ता. हवेली) असे आहे.
याबाबत त्याचे वडील महेश तुकाराम गायकवाड (वय 41) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश गायकवाड हे आपल्या मुलाला पोहण्याचा सराव व्हावा म्हणून बुधवारी दुपारी कोरेगाव मुळ येथील स्वामी समर्थ स्विमिंग टँकवर घेऊन आले होते. दुपारी सुमारे तीनच्या सुमारास यश इतर मुलांसोबत जलतरण तलावात पोहत होता. काही वेळाने वडील पुन्हा मुलाला पाहण्यासाठी गेले असता तो पाण्यात दिसून आला नाही. मुलगा दिसत नसल्याने त्यांनी तातडीने तेथील प्रशिक्षकांकडे चौकशी केली.
सुरुवातीला यश कपडे बदलण्यासाठी गेला असावा, असे सांगण्यात आले. मात्र बाथरूम, चेंजिंग रूम आणि परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही. त्यानंतर संशय आल्याने एका मुलाने पाण्याच्या तळाशी शोध घेतला असता यश बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तत्काळ त्याला बाहेर काढून प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर खासगी वाहनातून उरुळी कांचन येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.




