eKYC Pimpri Chinchwad: पुणे जिल्ह्यात चिंचवडचा दबदबा; ८५ टक्क्यांहून अधिक ई-केवायसी पूर्ण करून मारली बाजी
eKYC Pimpri Chinchwad: अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अहवालात चिंचवड विधानसभेची बाजी; ८५.४६ टक्के ई-केवायसी पूर्ण करून पुण्यात मिळवला प्रथम क्रमांक.

eKYC Pimpri Chinchwad – शिधापत्रिका धारकांच्या ई-केवायसी (eKYC) प्रक्रियेत पिंपरी-चिंचवड शहराने उल्लेखनीय कामगिरी करत पुणे शहरात आपला ठसा उमटवला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या ८ जून २०२६ पर्यंतच्या अहवालानुसार, पिंपरी-चिंचवडमधील अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणाऱ्या ‘अ’ कार्यालयाने तब्बल ८५.४६ टक्के ई-केवायसी पूर्ण करून पुण्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. संपूर्ण पुणे शहराची ई-केवायसी सरासरी ही एकूण ८०.८२ टक्के आहे.
त्यात पिंपरी-चिंचवड शहरामधील तीनही कार्यालयांची टक्केवारी ८० पेक्षा अधिक आहे. रेशन कार्डधारकांना शासकीय योजनांचा लाभ पारदर्शकपणे व योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. अहवालानुसार, चिंचवड विधानसभा क्षेत्र (अ विधानसभा ) अंतर्गत एकूण १ लाख ७६ हजार ६७३ लाभार्थी शिधापत्रिका धारक असून त्यापैकी १ लाख ६ हजार ३३८ ई-केवायसी मंजूर झाल्या आहेत.
केवळ ३०७ अर्ज नाकारण्यात आले असून ४४ हजार ६५७ अर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. यामुळे चिंचवडने ८५.४६ टक्के ई-केवायसी पूर्णत्वाचा टप्पा गाठला आहे. याचबरोबर भोसरी विधानसभा क्षेत्र (फ) अंतर्गत कार्यालयाने देखील प्रभावी कामगिरी नोंदवत ८३.९५ टक्के ई-केवायसी पूर्ण केली आहे. येथे १ लाख ८४ हजार ९३७ युनिट्सपैकी १ लाख २२ हजार ९३२ अर्ज मंजूर झाले आहेत. तर पिंपरी विधानसभा (ज ) ने ८२.०५ टक्के ई-केवायसी पूर्ण करत १ लाख ५६ हजार २३५ युनिट्सपैकी ८४ हजार ७५० अर्ज मंजूर केले आहेत.
विशेष म्हणजे, पुणे शहरातील विविध विधानसभांमध्ये स्पर्धा असताना चिंचवड अव्वल ठरल्याने पिंपरी-चिंचवड शहराचे नाव पुन्हा एकदा राज्याच्या प्रशासकीय कार्यक्षमतेच्या बाबतीत पुढे आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये शिधापत्रिकेसंबंधी सेवा देण्यासाठी चिंचवड (अ ), भोसरी (फ) आणि पिंपरी (ज) ही तीन प्रमुख कार्यालये कार्यरत आहेत. नवीन शिधापत्रिका काढणे, पत्ता बदल, नाव समाविष्ट करणे किंवा दुरुस्ती यांसारखी कामे संबंधित कार्यालयात तसेच महा फूडच्या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध आहेत.
ई-केवायसीमुळे शिधापत्रिका व्यवस्थेत पारदर्शकता वाढण्यास मदत होत असून बनावट लाभार्थ्यांना आळा बसणार आहे. त्याचवेळी पात्र नागरिकांना शासकीय धान्य व विविध योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांनी दाखवलेली जागरूकता आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे नियोजन यामुळे ई-केवायसी मोहिमेत शहराने पुण्यात बाजी मारली असून, ही कामगिरी इतर विभागांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
“पुण्यातून सर्वाधिक जास्त पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेची केवायसी मध्ये टक्केवारी आहे. एकूण पुण्यातील टक्केवारी पेक्षा सर्वाधिक टक्केवारी ही चिंचवड विधानसभेची आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही चिंचवड विधानसभेसाठी उल्लेखनीय आणि अव्वल कामगिरी आहे.”
– विजयकुमार शिरसागर, परिमंडळ अधिकारी, अ प्रभागपिंपरी चिंचवड






