Gram Panchayat Election: पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी; ७५४ गावांची अंतिम प्रभाग रचना जाहीर…वाचा सविस्तर
Gram Panchayat Election: डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत संपणाऱ्या ७५४ ग्रामपंचायतींसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; आज गावपातळीवर रंगणार आरक्षणाचा सस्पेन्स.
Gram Panchayat Election – पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील डिसेंबर 2026 पर्यंत मुदत संपणार्या तब्बल 754 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रक्रिया अत्यंत वेगाने सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील या 754 ग्रामपंचायतींची अंतिम प्रभाग रचना अखेर प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सध्या या ग्रामपंचायतींवर मावळते सरपंच प्रशासक आहेत. या ग्रामपंचायतींची प्रभागरचना अंतिम झाली आहे. तत्पूर्वी, सरपंच आरक्षणही जाहीर झाले आहे.
आता मतदार यादीचा कार्यक्रम राहिला आहे. राज्य सरकारच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी ग्रामविकास विभागाने परिपत्रक काढून ग्रामपंचायतींच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 30 मार्चपर्यंत प्रारूप प्रभागरचना तयार करण्याचे निर्देश दिले होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, अनुसूचित जाती (डउ),
अनुसूचित जमाती (डढ), नागरिकांचा मागास प्रवर्ग (जइउ) आणि महिलांसाठी आरक्षण निश्चितीची प्रक्रिया राबवली जात आहे. ओबीसी (जइउ) आरक्षण 27 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही याची काटेकोर काळजी घेण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच जनतेतून निवडले जाणार आहेत.
ग्रामपंचायत सदस्यांची आरक्षण सोडत 12 जूनला
राज्यातील मुदत संपलेल्या (2024 व 2025) ग्रामपंचायती व 2026 मध्ये मुदत संपणार्या ग्रामपंचायतींमधील ग्रामपंचायत सदस्यांची आरक्षण सोडत 12 जूनला काढली जाणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सरपंचाची निवड जनतेतून होणार असली, तरीही गावपातळीवर पॅनेलचे महत्त्व आजही कायम आहे. कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार आणि कोणत्या ठिकाणी कोणाला संधी मिळणार, याचे उत्तरच या आरक्षण सोडतीतून मिळणार आहे.
जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नुकतीच प्रभागरचना अंतिम करून ठेवली आहे. आता प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया 10 जुलैला अंतिम होणार आहे. त्यानंतर या निवडणुकीसाठी मतदारांची अहर्ता तारीख प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, या आरक्षण सोडतीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांपासून ते नवख्या उमेदवारांचे डोळे लागले असून, 12 जून रोजी कोणत्या प्रभागात कोणाचे नशीब उघडणार आणि कोणाचा पत्ता कट होणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.






