Sushma Andhare: माथाडी निरीक्षक भरतीत घोटाळा ; सुषमा अंधारे यांचा आरोप
Sushma Andhare:

फेरपरीक्षा घेण्याची मागणी
Sushma Andhare: कामगार आयुक्तालयाअंतर्गत घेण्यात आलेल्या माथाडी निरीक्षक पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नागपूरच्या एकाच परीक्षा केंद्रावरून तब्बल २४ विद्यार्थी टॉपर कसे आले, असा सवाल उपस्थित करत संपूर्ण परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली आहे.
या भरतीत ६२ जागांसाठी तब्बल २३ हजार ५७४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. मात्र, पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असतानाही, नागपूर केंद्रावरून २४ आणि पुणे केंद्रावरून केवळ ७ विद्यार्थ्यांची निवड झाल्याने निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याशिवाय नागपूरच्या या टॉपर्सना इतर परीक्षांमध्ये कमी गुण असताना याच परीक्षेत अव्वल कसे आले, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
प्रश्नपत्रिका आधीच फुटली होती का, याची सखोल चौकशी करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबधित अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी अंधारे यांनी केली.
दरम्यान, याप्रकरणी सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर आरोप केल्यानंतर, एमपीएससीने तात्काळ स्पष्टीकरण देत ही भरती प्रक्रिया आयोगामार्फत घेण्यात आली नसल्याचे स्पष्ट करून ही परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या कामगार आयुक्तालयामार्फत आयोजित करण्यात आली होती, असे सांगितले आहे.





