Pune Navratri Festival : पोलीस क्षेत्रात महिला अधिकाऱ्यांचे योगदान एक पाऊल पुढे : संजय दराडे
Pune Navratri Festival : श्री महालक्ष्मी मंदिरात कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

Pune Navratri Festival : पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र पुणेकरांच्या सुरक्षेसाठी काम करतात. पोलीस दलातील आव्हानात्मक नोकरी सांभाळतानाच त्या कुटुंबाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडतात. त्यामुळे पुरुषांचे वर्चस्व असलेल्या पोलीस क्षेत्रात महिला पोलिसांचे योगदान पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहे, असे प्रतिपादन पोलीस सह आयुक्त संजय दराडे यांनी केले.
सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या वतीने कर्तृत्ववान महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संजय दराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती भरत अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, युवराज लाहोटी, विशाल सोनी आदी उपस्थित होते.
दराडे म्हणाले, पोलीस दलात गेल्या २० वर्षांपासून महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण आहे. पोलिसांचे काम आव्हानात्मक असून, २४ तास दक्ष राहावे लागते. कधीही फोन आल्यानंतर तातडीने कर्तव्यावर हजर व्हावे लागते. अशा परिस्थितीतही महिला पोलीस अधिकारी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून पोलीस दलाचे कर्तव्य बजावतात. डॉक्टरांची ओपीडी रात्री बंद होते; मात्र महिला पोलिसांचे काम २४ तास सुरू असते. या आव्हानांना त्या धैर्याने सामोरे जातात.
भरत अग्रवाल म्हणाले, नवरात्रोत्सवात देवीचा जागर केला जातो. यानिमित्त समाजाच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्याची संधी मिळाली. महिलांना संधी दिल्यास त्या पुरुषांनाही मागे टाकू शकतात. अनेक क्षेत्रांत महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.
या वेळी अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, सहायक पोलीस आयुक्त अनिता मोरे, नूतन पवार, नम्रता देसाई, स्वप्ना बोकील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, अश्विनी सातपुते, माया देवरे, रुणाल मुल्ला, सुनीता नवले, प्रियंका गोरे, सहायक पोलीस निरीक्षक शरयू देशमुख, संजना काकडे तसेच वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार यांचा सन्मान करण्यात आला.





