Kurash: ‘कुराश’चा खेळ खल्लास!
Kurash:

१९ पोलिसांची नोकरी जाणार; प्रशिक्षणासाठी गेलेल्या नऊ जणांना परत बोलावण्याचे आदेश
Kurash: कुराश खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून खेळाडू आरक्षणातून पुणे शहर पोलिस दलात भरती झालेल्या १९ जणांना सेवेतून कायमचे काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या प्रकरणात दहा उमेदवारांना अद्याप सेवेत हजर करून घेण्यात आले नव्हते. तर, नऊ जणांना विविध प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्यांनाही आता परत बोलावून घेण्याचे आदेश दिले आहेत. नोकरी गमावण्याबरोबरच या उमेदवारांवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवारही आहे.
महाराष्ट्र शासनाच्या खेळाडूंसाठी असलेल्या पाच टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेण्यासाठी कुराश या खेळाची बनावट प्रमाणपत्रे तयार केली होती. या प्रमाणपत्रांच्या आधारे पुणे शहर पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत १९ उमेदवारांनी नोकरी मिळविल्याचा प्रकार तपासात उघडकीस आला आहे.
या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई करीत महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे यांच्यासह चौघांना अटक केली आहे.
अटक केलेल्यांमध्ये श्रृती पुनगावकर आणि तिचे पती धैर्यशील पुनगावकर यांचाही समावेश आहे. हे दोघे क्रीडा प्रशिक्षण केंद्र चालवितात. त्यांच्याच केंद्रातून कुराश खेळाची बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी परभणी जिल्हा संघटक कल्याण बालासाहेब मुरकुटे, धाराशिव जिल्हा संघटक चांदपाशा लालासाहेब शेख यांच्यासह इतर जिल्ह्यांतील संघटक आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड यांनी फिर्याद दिली आहे.
१९ संघटनाही पोलिसांच्या रडारवर कुराश खेळाच्या तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या १९ संघटना तसेच त्या चालविणाऱ्या व्यक्तीही पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत.





