Road safety: रस्ता सुरक्षेसाठी महिला अधिकाऱ्यांचा पुढाकार
Road safety:

पुणे आरटीओचा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम
Road safety: नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे येथे महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येत रस्ता सुरक्षेविषयी जनजागृतीचा संदेश दिला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या उपस्थितीत कार्यालयातील महिलांनी नवरात्रीच्या नऊ रंगांचा आणि नऊ रूपांचा संदर्भ घेत नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
या वेळी महिला अधिकाऱ्यांनी कवितेच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचा संदेश दिला. नवरात्रीला लावूया अखंड दिवा, सुरक्षित प्रवासाचा जप मनी ठेवा आणि नऊ रंगांच्या नऊ साड्या, वेग नियंत्रणात ठेवू सर्वच गाड्या, अशा सोप्या व आकर्षक काव्यपंक्तींद्वारे हेल्मेट, सीटबेल्टचा वापर आणि वेग नियंत्रणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
अपघातांचा रंग मिटवून जीवन सोपे करण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले. या वेळी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहल माटे, सुकन्या मुंडे, मोटार वाहन निरीक्षक स्मिता कोले, तृप्ती पाटील, आश्विनी जाधव, अमृता भालशंकर आणि कार्यालयीन अधीक्षक श्वेता सिंग यांच्यासह सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व महिला कर्मचारी उपस्थितीत होते.





