Suryansh Shedge Reaction : “माझ्यासाठी आईने स्वतःच्या करिअरचा बळी दिला…”, टीम इंडियात निवड होताच सूर्यांश शेडगे भावुक
Suryansh Shedge Reaction : भारतीय संघात निवड झाल्यानंतर सूर्यांशची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली असून, त्याने या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले आहे.

Suryansh Shedge 1st Reaction Selection India Tour Of Ireland England : दुखापतग्रस्त नितीश कुमार रेड्डीच्या जागी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात अचानक संधी मिळालेला मुंबईचा २३ वर्षीय अष्टपैलू खेळाडू सूर्यांश शेडगे कमालीचा भावुक झाला आहे. भारतीय संघात निवड झाल्यानंतर सूर्यांशची पहिली अधिकृत प्रतिक्रिया समोर आली असून, त्याने या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले आहे. टीम इंडियाची जर्सी मिळवण्याच्या त्याच्या या प्रवासात आपल्या आईने दिलेल्या प्रचंड बलिदानाचा त्याने अत्यंत भावुक होऊन उल्लेख केला.
“माझ्यासाठी आईने बँकेतली नोकरी सोडली!”
सूर्यांशने सांगितले की, त्याला अजूनही विश्वास बसत नाहीये की त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. तो म्हणाला, “माझं क्रिकेट करिअर घडवण्यासाठी माझ्या आईने स्वतःच्या करिअरचा बळी दिला. ती बँकेत चांगल्या पदावर काम करत होती. मात्र, मला रोज प्रॅक्टिसला घेऊन जाणे, वेगवेगळ्या मैदानांवर सामन्यांसाठी सोबत येणे आणि माझ्या डाएटची काळजी घेणे यासाठी तिने थेट आपली नोकरी सोडून दिली.”याशिवाय, गेल्या दोन वर्षांपासून मार्गदर्शन करणारे भारताचे माजी फलंदाज जतिन परांजपे आणि इतर प्रशिक्षकांचेही सूर्यांशने आभार मानले, ज्यांनी त्याच्या क्षमतेवर नेहमीच विश्वास ठेवला.
कॅप्टन श्रेयस अय्यर असण्याचा सर्वात मोठा फायदा –
🚨🗣️ SURYANSH SHEDGE REACTS TO HIS MAIDEN INDIA CALL-UP 🇮🇳
“I still can’t believe it.
This has been my dream since childhood.” pic.twitter.com/JVviF2YmAR
— TheWicketReport (@WicketReport) June 23, 2026
आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. श्रेयस कर्णधार असणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, असे सूर्यांशने सांगितले.
तो म्हणाला, “मी मुंबई आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्स या दोन्ही संघांसाठी श्रेयस अय्यरच्याच कप्तानीखाली खेळलो आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत श्रेयसच्याच मार्गदर्शनाखाली मी चार मोठे डेब्यू केले आहेत. यामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, ‘इंडिया-ए’ संघ आणि आयपीएलचा समावेश आहे. त्यामुळे त्याच्यासोबत ताळमेळ बसवणे सोपे जाईल.”
टी-२० मध्ये १७८ चा तुफानी स्ट्राईक रेट –
सूर्यांशने नुकत्याच श्रीलंकेत पार पडलेल्या तिरंगी मालिकेत इंडिया ‘अ’ कडून खेळताना मधल्या फळीत १४७ धावा केल्या आणि गोलंदाजीतही चमक दाखवली. तो खालच्या क्रमांकावर वेगाने धावा कुटण्यासाठी आणि मध्यम गतीने अचूक गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत ८ प्रथम श्रेणी सामन्यांत ४३९ धावा, १३ लिस्ट-ए सामन्यांत २५८ धावा केल्या आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १७८ हून अधिकच्या विध्वंसक स्ट्राईक रेटने ३५६ धावा ठोकल्या आहेत.





