Shree Charani No1 : २१ वर्षांच्या श्री चरणीने रचला नवा इतिहास! पदार्पणानंतर अवघ्या एका वर्षात पटकावला ‘हा’ मोठा बहुमान
Shree Charani No1 : भारताची २१ वर्षांची युवा फिरकीपटू श्री चरणी (Shree Charani) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.

Shree Charani Becomes World No 1 T20I Bowler ICC Rankings : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘महिला टी-२० विश्वचषक २०२६’ स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारताची २१ वर्षांची युवा फिरकीपटू श्री चरणी (Shree Charani) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय पदार्पणाला अवघे एक वर्ष पूर्ण होण्याच्या आतच तिने आयसीसी जागतिक क्रमवारीत जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज बनण्याचा बहुमान पटकावला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत श्री चरणी ७५३ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी पोहोचली आहे.
विश्वचषकातील कामगिरीचा थेट फायदा-
श्री चरणीने गेल्या वर्षी २८ जून रोजी आपला पहिला आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. चालू विश्वचषक स्पर्धेत तिने आपल्या फिरकीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना पुरते जेरीस आणले आहे. तिने केवळ ३ सामन्यांत तब्बल १० विकेट्स घेतल्या आहेत. या धमाकेदार कामगिरीचा थेट फायदा तिला आयसीसी क्रमवारीत मिळाला. तिने इंग्लंडच्या लिंसे स्मिथला मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेतली. या यादीत आता इंग्लंडची चार्ली डीन (७३३ गुण) दुसऱ्या, लिंसे स्मिथ (७२६ गुण) तिसऱ्या आणि सोफी एक्लेस्टोन चौथ्या स्थानावर आहे.
फलंदाजीत शफाली वर्मा आणि हरमनप्रीतची प्रगती –
A monumental milestone! 🔝
Sree Charani’s wicket-taking form takes her to the summit of the ICC Women’s T20I Bowling Rankings for the very first time 1️⃣👏#TeamIndia | #WomenInBlue | #T20WorldCup pic.twitter.com/K0TE8h26mH
— BCCI Women (@BCCIWomen) June 23, 2026
आयसीसीच्या ताज्या फलंदाजीच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची सलामीवीर जॉर्जिया व्होल पहिल्या तर बेथ मुनी दुसऱ्या स्थानावर कायम आहे. भारतीय फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, धडाकेबाज सलामीवीर शफाली वर्मा एका स्थानाच्या फायद्यासह थेट ६ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर कर्णधार हरमनप्रीत कौर ही देखील एका स्थानाची प्रगती करत जगातील अव्वल १० फलंदाजांच्या यादीत (१० व्या क्रमांकावर) सामील झाली आहे. जागतिक पातळीवर भारताच्या या ‘वंडर गर्ल’ने मिळवलेले हे यश कौतुकास्पद ठरत आहे.
श्री चरणी आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्याची रहिवासी आहे. तिच्या मामामुळे ती व्यावसायिक क्रिकेटपटू बनली. तिच्या जडणघडणीत तिच्या कुटुंबानेही महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी, तिच्या अनेक नातेवाईकांनी तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तिच्या क्रिकेट खेळण्यामुळे आणि केस लहान ठेवण्यामुळे ते अनेकदा त्रस्त होते, पण आता, या खेळाडूने अव्वल गोलंदाज बनून सर्वांची तोंडे बंद केली आहेत





