Supriya Sule : पुरंदर तालुक्यात संपूर्ण टोलमाफी द्या! सुप्रिया सुळेंनी थेट नितीन गडकरींना धाडलं पत्र
Supriya Sule : सासवड-जेजुरी दरम्यानच्या बेलसर टोलनाक्यावर पुरंदरवासीयांना १००% सूट मिळावी; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना लिहिलं पत्र.

Supriya Sule – पुणे – पंढरपूर पालखी महामार्ग (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५) या महामार्गासाठी पुरंदर तालुक्यातील अनेक शेतकरी आणि व्यावसायिकांनी आपल्या जमिनी दिल्या असून सर्वच पुरंदरवासीयांना या टोलनाक्यावर पूर्णतः माफी मिळावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते विकास महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेकडे पत्राद्वारे केली. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना याबाबत सूचना देण्याची विनंती पत्रामध्ये केल्याचे समजते.
पुणे- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील सासवड -जेजुरी दरम्यान बेलसर गावचे हद्दीत तक्रारवाडी फाट्यानजीक टोलनाका निर्माण करण्यात आला असून पुढील महिन्यापासून या टोलनाक्यावरून वाहन चालकांकडून टोल वसुलीस सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने संभाजी ब्रिगेड, बहुजन हक्क परिषद, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार) आदी विविध सामाजिक संघटना व शेतकरी, व्यावसायिक विशेषतः पुरंदरवासीयांनी “टोलमाफी मिळावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे केली होती.
(दि.२०) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे येथील कार्यालयामध्ये प्रकल्प अधिकारी संजय कदम, अभिजित आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार २० किलोमीटर अंतरावरील पुरंदरवासीयांना ३५० रुपयांच्या मासिक पासाची सवलत देणार असल्याचे सूचित केले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अधिकारी यांच्या निर्णयामुळे पुरंदरवासीयांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सर्वच पुरंदरवासीयांना या टोलनाक्यावर पूर्णतः टोलमाफी मिळावी, अशी मागणी सर्वस्तरातून व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांतून होत आहे.
खासदार सुळेंकडून पाठपुरावा
सप्टेंबर २०२५ मध्ये सासवड येथे खासदार सुप्रिया सुळे, पुरंदरमधील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यात बैठक झाली होती. यावेळी सासवड ते जेजुरी या राष्ट्रीय महामार्गावर आवश्यक तेथे उड्डाणपूल निर्माण व्हावेत, पुरंदरवासीयांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी केली होती. खासदार सुळे यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे थेट पत्राद्वारे पुन्हा मागणी केली आहे. याबाबत फेसबुक पोस्ट सुद्धा केली आहे.





