पुणे जिल्हा | आमदार अशोक पवार समर्थक सरसावले ; विरोधकांच्या राजकारणाला चोख प्रत्त्युतर

मांडवगण फराटा, (वार्ताहर)- रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्यात झालेल्या सर्वसाधारण सभेवरून मांडवगण फराटा (ता. शिरूर) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मांडवगण फराटा येथील पदाधिकारी,
कार्यकर्ते हे आमदार अशोक पवार यांच्यासाठी मैदानात सरसावले आहे. दरम्यान, शिरूर तालुक्यात विरोधकांनी घोडगंगा बचाव किसान क्रांती पदयात्रा काढून ठीक ठिकाणी आमदार अशोक पवार यांच्यावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतली आहे.
शंकरराव फराटे म्हणाले की, कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत विरोधकांनी जाणूनबुजून गोंधळ घातला. सभेच्या अर्धा तास आधीच माईकवर भाषणे सुरू केली. चेअरमन प्रस्तावनेत सविस्तर माहिती देत होते. त्यातच सभासदांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे होती.
नेमके हेच विरोधकांना नको होते.आमदार अशोक पवार हे कारखाना सुरू व्हावा म्हणून मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, उच्च न्यायालय या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांना कोणताच मुद्दा नसल्याने या पदयात्रेत आमदार पवार यांच्यावर टीका करताना दिसले.
खंडेराव फराटे म्हणाले की, आमदार अशोक पवार यांच्याबरोबर राहून सगळी पदे उपभोगली अन आज पवारांच्या विरोधात कारखान्यातील चुका सांगत आहेत.
टर्बाईन सुरू झाल्यानंतर हेच व्हाइस चेअरमन म्हणून माऊली मंदिरात टर्बाईन किती चांगले चालले या विषयी मोठे भाषण केले होते. पदावर असताना चुकीच्या गोष्टीची माहिती सर्वसाधारण सभेत का मांडली नाही. तिथे तर तुम्हाला कोणीच अडविले नसते.
बाळासाहेब फराटे म्हणाले की, राजकारणात एखाद्याबद्दल टीका होती पण या पदयात्रेत फार खालच्या पातळीवर टीका केली. प्रत्येक ठिकाणी रावसाहेब पवार यांचे नाव घेऊन भाषणे ठोकली. मग बॅनरवर फक्त घोडगंगा एव्हढेच नाव का घेतले.
संभाजी फराटे म्हणाले की, कारखान्याची सर्वसाधारण सभा शांततेत सुरू असताना चेअरमन सर्व प्रश्नांना उत्तरे देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला.
चेअरमन यांचा माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न विरोधक करीत असताना माईकची वायर काढावी लागली. पदयात्रेची सुरवातीलाच रोजंदारीवरील लोकांना आणावे लागले. सभासदांनी पदयात्रेकडे पाठ फिरवली असून यांचे गर्दीचे एकही व्हिडीओ व्हायरल झाले नाहीत.
यावेळी दत्तात्रय फराटे, संभाजी फराटे, शंकर फराटे, खंडेराव फराटे, दिलीप फराटे, शरद चकोर, बाळासाहेब फराटे, रावसाहेब जगताप, हनुमंत तांबे, प्रवीण कुंभार, जगन्नाथ जगताप, बाळासाहेब फराटे, शितोळे उपस्थित होते.
विधानसभा डोळ्यासमोर विरोधात प्रचार
दत्तात्रय फराटे म्हणाले की, शरद पवार हे सर्वांचे आदरस्थान आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
आम्ही अजित पवार यांच्याबरोबर अनेक वर्षे राहिलेलो आहेत. कारखाना सुरू करण्यासाठी तुम्ही अजित पवार यांच्याकडे प्रयत्न करा.
आम्ही तुमच्याबरोबर येऊ. विरोधकांनी फक्त विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आमदार अशोक पवार यांच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे.
शिरूर-हवेली तालुक्यात आमदारांनी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या गावात सुद्धा निधी मंजूर करून दिला आहे. फक्त श्रेयवाद यावरून अनेक कामे अडविली आहेत. मंजूर निधी शासकीय पातळीवर अडविण्याचे काम केले आहे.





