पुणे जिल्हा | घोडगंगा कारखान्याविरोधात एल्गार

मांडवगण फराटा, (वार्ताहर)- घोडगंगा सहकारी साखर कारखाना गेली दोन वर्षे बंद आहे. कारखाना सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्ज मिळून दिले नाही असा प्रचार आमदार अशोक पवार हे सध्या तालुक्यातील जनतेला सांगत आहेत.
खरी वस्तुस्थिती काय आहे हे सर्वांना माहीत व्हावे म्हणून (दि.२२) सप्टेंबरपासून लढा शिरूरच्या स्वाभिमानाचा पदयात्रेचे आयोजन केले आहे, अशी माहिती घोडगंगा कारखाना माजी संचालक सुधीर फराटे यांनी दिली.
मांडवगण फराटा येथे घोडगंगा किसान क्रांती मोर्चा व शिरूर तालुक्यातील महायुतीच्या सर्वपक्षीय अध्यक्षांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
सुधीर फराटे म्हणाले की, दि. १८ सप्टेंबर लोकनेते (स्व) बाबुराव पाचर्णे स्मृतीस्थळ येथे सर्व सभासद व महायुतीचे कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली आहे.
त्यामध्ये दि. २२ सप्टेंबरपासून तालुक्यात पदयात्रा सुरु करणार आहे. २०० किमी पायी चालत घोडगंगाची कागदोपत्री पुराव्यानिशी खरी वस्तुस्थिती मांडणार आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवी काळे म्हणाले की, निष्ठावान म्हणून सध्या सर्वत्र आमदार अशोक पवार प्रचार करीत आहेत.
१९८५ साली शरद पवार यांचे उमेदवार बापूसाहेब थिटे यांच्या विरोधात काम कोणी केले. १९९० साली शरद पवार यांचे उमेदवार बापूसाहेब थिटे यांच्या विरोधातील संभाजी काकडे यांचे काम कोणी केले,
१९९५ साली पोपटराव गावडे यांच्या विरोधात बाबुराव पाचर्णे यांना कुणी उभे केले. १९९७ साली शरद पवार व अजित पवार यांच्या पॅनल विरोधात पॅनल कुणाचा होता. या सर्व प्रश्नांची उत्तरे स्वतःला विचारून पहा म्हणजे निष्ठा कळेल.
दादा पाटील फराटे म्हणाले की, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या लोकांवर आरोप करायचे. एका पंचवार्षिक निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, दुसऱ्या वेळी बाबुराव पाचर्णे व आता अजित पवार.
मुळात घोडगंगा कारखान्याने अनेक पुरस्कार मिळवले असताना नफ्यात चालण्याऐवजी कर्ज मागण्याची वेळच का आली, याचे उत्तर सभासदांना दिले पाहिजे, असे आव्हान त्यांनी आमदार अशोक पवार यांना दिले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, शिवसेनेचे रामभाऊ सासवडे, अनिल काशिद, राजेंद्र कोरेकर, राहुल पाचर्णे, मयूर थोरात, अनिल बांडे, सचिन मचाले, संतोष नागवडे यांनीही घोडगंगा कारखान्याची सत्य परिस्थिती मांडली.
व्यंकटेश कृपाला जिल्हा बँकेने कर्ज दिले
घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे म्हणाले की, दहा वर्षांपूर्वी घोडगंगा कारखाना बंद पडेल तो वाचविण्यासाठी तालुक्यात पदयात्रा केली. आता बंद पडलेला कारखाना सुरू झाला पाहिजे म्हणून तालुक्यात पदयात्रा काढली आहे.
व्यंकटेश कारखान्याला सर्वोच्च आर्थिक नियोजनाचे पारितोषिक मिळते. मग २५ वर्षे तुमच्याच ताब्यात असणाऱ्या घोडगंगा कारखान्याचे आर्थिक नियोजन ढासळतेच कसे.
अजित पवार कर्जे मिळवू देत नाहीत असा अपप्रचार करायचा तसे असते तर व्यंकटेश कृपा कारखान्याला जिल्हा बँकेने ३४० कोटी रुपये कर्ज दिलेच नसते. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करायचे चुकीचे आहे.





