पिंपळसुट्टी येथील ‘त्या’ तरूणाच्या कुटुंबातील चौघांना करोनाची लागण

दिवसभरात ५ जण पॉझिटिव्ह आढळल्याने परिसरात खळबळ
मांडवगण फराटा(प्रतिनिधी) : पिंपळसुट्टी येथील एका ३० वर्षीय वकील असलेल्या तरुणाचा दोन दिवसांपुर्वी करोना पॉझीटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. त्याच तरुणाच्या कुटुंबातील अन्य चौघांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॅ .मंजुषा सातपुते -इसवे यांनी दिली आहे.
मांडवगण फराटा येथे एका खाजगी दवाखान्यात काम करणाऱ्या ३० वर्षीय कर्मचाऱ्याला सुद्धा करोनाचा संसर्ग झाला असल्याचे आज निष्पन्न झाले होते. परंतु पिंपळसुट्टी येथील एकाच कुटुंबातील ४ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने करोनाने आता रुग्णसंख्या वाढत असल्याने या परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
पिंपळसुट्टी येथील या तरुणाच्या संपर्कातील सर्वाचे स्वॅब सोमवारी (दि.२० ) रोजी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज दुपारी त्यामधील तरुणाची आई, भाऊ, पुतणी, बहीण या ४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व रुग्णाच्या संपर्कात इनामगाव येथील एक ड्रायव्हर आला असून त्याला होम क्वारंटाइन केले आहे. तसेच या सर्वांना जास्त त्रास होत नसल्याने घरीच क्वारटांइन करण्यात आले आहे.
पिंपळसुट्टी येथील या चार रुग्णांमुळे शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात करोना रुग्णाची संख्या आता नऊ झाली आहे. यात मांडवगण फराटा येथील २, गणेगाव दुमाला १, पिंपळसुट्टी ५, नागरगाव १ अशा पाच रुग्णांचा यात समावेश आहे. मांडवगण फराटा येथील माजी सरपंचावर उपचार करणारा हा कर्मचारी पाॅझिटिव्ह सापडल्याने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.
दिवसेंदिवस करोना रुग्णाच्या आकडेवारीत वाढ होत असताना शिरूरचा पुर्व भाग हा करोनाचा हॉटस्पाॅट होतो कि काय, अशी परिस्थिती सध्या या परिसरात झाली आहे. शिरुर तालुक्याच्या पुर्व भागात सातत्याने करोना रुग्णाची संख्या वाढत असून ज्या व्यक्ती संबंधित करोनाबधित रुग्णांच्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी पुढे येत प्रशासनाला माहिती देत सहकार्य करावे. त्याचबरोबर परिसरातील कोणात्याही व्यक्तीला सर्दी, खोकला, ताप सदृश्य लक्षणे दिसत असतील त्यांनी ताबडतोब येथील आरोग्य विभागाला कळविणे गरजेचे आहे असे आवाहन मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते- इसवे यांनी नागरिकांना केले आहे. .





