Pune District : पूर्व भागात चोरीचे सत्र थांबेना

मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील पूर्व भागात लागोपाठ चोरीचे सत्र सुरू आहे. मांडवगण फराटा गावची यात्रा असल्याने कार्यक्रमानिमित्त अनेकजण वाड्या- वस्तीवरील लोक गावात येत असतात. त्याचाच फायदा चोरटे घेत असतात. असेच रात्री तीन वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून चोर आल्याच्या अफवा फिरत होत्या.
शिरूर तालुक्यात इतरत्र अनेक ठिकाणी विजेवर चालणारे पंप, केबल, ट्रान्सफॉर्मर, मोटारसायकल, घरफोडी लहान मोठी चोरी असे प्रकार सध्या वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी इनामगाव, तांदळी, सादलगाव ,वडगाव रासाई या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलीस रात्रंदिवस पहारा करीत असूनही चोरीच्या घटना घडतच आहेत.
मंगळवारी (दि.२५) शिरसगाव काटा येथील घोडनदीच्या पात्रातील सौरऊर्जेचा साडेसात अश्व शक्तीचा पंप चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत स्वप्निल जनार्दन काटे (रा. शिरसगाव काटा) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केला आहे.
एस. टी प्रवासात बसमधील वृद्धांना लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. बुधवार (दि.२६) शोभा आत्माराम लोंढे(वय ६०, रा. शिरूर यांची चौफुला – शिरूर एसटी बसमध्ये प्रवास करताना बॅग वाहकाच्या सीट खाली ठेवली. सीटच्या खालील बॅग मधील सव्वाचार तोळ्याचे दागिने, चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांने चोरुन नेला आहे.
शोभा आत्माराम लोंढे (रा. वाडाकॉलनी, शिरुर) यांचे दागिने प्रवासादरम्यान चोरले आहेत. या प्रकरणी शोभा लोंढे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना केडगाव चौफुला ते शिरुर प्रितमप्रकाश नगर, दरम्यान शिरुर-चौफुला एस टी बसमध्ये घडली. कंडक्टर शेजारी बसलेल्या शिटखाली लोंढे यांनी ठेवलेल्या बॅगमधून चोरट्याने दागिने व रोख रक्कम दहा हजार रुपये चोरीला गेले.





