Amit Shah: ‘नक्षलवाद्यांना होणारा शस्त्रे व पैशाचा पुरवठा थांबला पाहिजे’ – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

Amit Shah | Naxalite – नक्षलवाद्यांना होणारा शस्त्रपुरवठा व आर्थिक मदत थांबली पाहिजे तसेच डाव्या विचारसरणीच्या विरूद्धच्या मोहीमेला अधिक गती देण्याची गरज आहे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. त्यांनी काल रायपुर मध्ये सात नक्षलग्रस्त राज्यांतील वरीष्ठ अधिकाऱ्यांची आंतरराज्य समन्वय बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत डाव्या विचारसरणीचा सामना करण्यासाठीची रणनीती, आंतरराज्य समन्वय, सुरक्षा दलांची क्षमता वाढवणे, नक्षलवाद्यांच्या खटल्यांचा त्वरीत तपास करणे आणि माओवादग्रस्त भागांचा व्यापक विकास करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
बैठकीला संबोधित करताना शहा म्हणाले की नक्षलवादाच्या विरुद्धची मोहीम आता निर्णायक टप्प्यावर आली आहे आणि मार्च २०२६ पूर्वी या धोक्याचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे.
नक्षलवादाविरुद्धच्या कारवायांच्या सुरुवातीला ज्या गतीने आणि तीव्रतेने काम केले त्यापेक्षा दुप्पट वेगाने आणि तीव्रतेने काम करण्याची गरज आहे, तरच ही समस्या आपल्या देशातून पूर्णपणे संपुष्टात येऊ शकेल, असे ते म्हणाले.
नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्य सचिवांनी दर पंधरवड्याला नक्षल प्रभावित भागातील विकास कामांची आढावा बैठक घ्यावी. जोपर्यंत नक्षलविरोधी कारवायांवर सातत्याने लक्ष ठेवले जात नाही तोपर्यंत आपल्याला अपेक्षित परिणाम साधता येणार नाही, असे ते म्हणाले.
नक्षलवादाशी संबंधित आंतरराज्य प्रकरणांचा तपास राज्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवावा, असे शहा यांनी सांगितले. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन, इंटेलिजन्स ब्युरो आणि एनआयएचे संचालक, सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपीचे महासंचालकही बैठकीत सहभागी झाले होते.
हे देखील वाचा….





