‘देशाला मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादमुक्त बनवणार’ – अमित शहा

रायपूर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी देशाला मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादमुक्त बनवण्याची ग्वाही दिली. तसेच, नक्षलवादाच्या आव्हानावर अखेरचा प्रहार करण्यासाठी मजबूत रणनीती आखण्याची गरज अधोरेखित केली.
शहा यांनी छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय आणि केंद्रीय तसेच पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये नक्षलवादाच्या समस्येचा आढावा घेण्यात आला.
त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना शहा यांनी आगामी काळात नक्षलवादाचे उच्चाटन करण्याविषयी विश्वास व्यक्त केला. त्यांनी नक्षलवाद्यांना हिंंसाचाराचा मार्ग सोडण्याचे आवाहनही केले. लोकशाहीच्या दृष्टीने नक्षली हिंसाचार मोठे आव्हान आहे.
नक्षलवादाशी संबंधित घटनांमध्ये देशात आतापर्यंत १७ हजार जणांना जीव गमवावा लागला. अर्थात, वर्ष २००४ ते २०१४ या कालावधीच्या तुलनेत मागील १० वर्षांत नक्षली घटनांमध्ये ५३ टक्क्यांनी घट झाली.
आता त्या समस्येवर अखेरचा प्रहार करण्याची वेळ आली आहे. नक्षलग्रस्त भागांमधील सुरक्षाविषयक पोकळी भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सुरक्षा जवानांकडून विशेष मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. त्याशिवाय, विकासकामेही सुरू आहेत.





