Gautam Gambhir : ‘यशाचं श्रेय दिलं होतं का?’, गंभीरवर टीका करणाऱ्यांना गावस्करांचा सवाल; म्हणाले, ‘मग पराभवानंतरच का…’

गावस्कर गंभीरच्या समर्थनार्थ आले पुढे –
भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर हे गंभीर यांच्या बचावासाठी पुढे सरसावले आहेत. पराभवासाठी केवळ गंभीर यांना जबाबदार धरले जात असेल, तर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकल्याबद्दल त्यांना श्रेय दिले गेले होते का, असा थेट सवाल गावस्करांनी टीकाकारांना केला आहे. इंडिया टुडेसोबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “गंभीर प्रशिक्षक आहेत. प्रशिक्षक फक्त संघ तयार करू शकतो, पण मैदानात खेळाडूंनाच प्रदर्शन करून दाखवावे लागते.”
गावस्करांनी टीकाकारांनी विचारला प्रश्न –
सुनील गावस्कर पुढे म्हणाले, “जे लोक या पराभवासाठी गंभीर यांना जबाबदार धरत आहेत, त्या सर्वांना माझा प्रश्न आहे की, गंभीर यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली किंवा आशिया कपच जिंकला, तेव्हा तुम्ही काय केले? तुम्ही तेव्हा त्यांचे कॉन्ट्रॅक्ट वाढवून त्यांना वनडे आणि टी-२० साठी कायमस्वरूपी प्रशिक्षक बनवा, असे म्हणालात का? तुम्ही असे काहीही म्हटले नाही. जेव्हा टीम खराब प्रदर्शन करते, तेव्हाच तुमचे लक्ष प्रशिक्षकाकडे जाते.”
हेही वाचा – Commonwealth Games 2030 : भारताला 15 वर्षांनंतर ‘राष्ट्रकुल’चे यजमानपद! ‘या’ शहरात पार पडणार संपूर्ण स्पर्धा
भारताची कसोटी इतिहासातील सर्वात मोठी हार –
या मालिकेत भारताला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. गुवाहाटी कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारताचा तब्बल ४०८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. धावांच्या फरकाने झालेला हा टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधील आजवरचा सर्वात मोठा पराभव आहे.
हेही वाचा – SMAT 2025 : मोठा उलटफेर! दुबळ्या जम्मू-काश्मीरने महाराष्ट्राला पहिल्याच सामन्यात लोळवले
या संपूर्ण मालिकेत भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. २० वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे की, भारतीय संघातील एकाही फलंदाजाला संपूर्ण कसोटी मालिकेत शतक झळकावता आले नाही. सलग दोन कसोटी सामन्यांत झालेल्या या पराभवामुळे भारतीय संघाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशांनाही मोठा धक्का बसला आहे.





