Sumona Chakravarti : मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांपासून मुंबईत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला राज्यभरातून हजारो मराठा बांधवांनी हजेरी लावली आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक दक्षिण मुंबईत दाखल झाले आहेत. या आंदोलनामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, रस्ते बंद आणि नागरिकांना गैरसोयीच्या घटना समोर येत आहेत. अशाच एका प्रसंगाबद्दल अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने इन्स्टाग्रामवर आपला अनुभव शेअर केला होता. तिने आंदोलनकर्त्यांवर अप्रत्यक्ष टीका करताना कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, तिची पोस्ट काही वेळातच तिने डिलीट केली. गाडी रोखून त्रास दिल्याचा आरोप सुमोनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “मी कुलाब्याहून फोर्टकडे जात असताना अचानक गर्दीने माझ्या गाडीचा रस्ता अडवला. एक व्यक्ती माझ्या कारच्या बोनटवर हात आपटू लागला आणि चेहऱ्यावर मिश्कील हसू ठेवत होता. त्याने आपल्या पोटाने माझ्या गाडीवर दाब दिला आणि माझ्यासमोर नाचू लागला. इतर जण गाडीच्या काचेजवळ येऊन ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा देत हसत होते. अवघ्या काही मिनिटांत हा प्रकार दोनदा घडला.” तिने सांगितले की, या घटनेदरम्यान तिथे कुठेही पोलीस नव्हते. काही पोलीस दिसलेही, पण ते निवांत गप्पा मारत बसले होते. “दक्षिण मुंबईसारख्या भागात, दिवसाढवळ्या, माझ्या स्वतःच्या गाडीतही मला असुरक्षित वाटलं. हा अनुभव धक्कादायक होता,” असे सुमोनाने नमूद केले. रस्त्यावर कचरा आणि अराजकतेचे चित्र सुमोनाने आंदोलनकर्त्यांच्या वागणुकीबाबतही नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, “रस्त्यांवर केळ्याच्या साली, प्लॅस्टिकच्या बाटल्या, कचरा विखुरलेला होता. पादचारी मार्गावर चालायला जागा नव्हती. लोक रस्त्यावर खाणं-पिणं, झोपणं, आंघोळ करणं, स्वयंपाक करणं, रील्स बनवणं, अगदी मुंबईचं पर्यटनही करत होते. हे पाहून नागरी कर्तव्यांची जणू थट्टाच उडवली जात असल्यासारखं वाटलं.” “पहिल्यांदाच मुंबईत असुरक्षित वाटलं” सुमोना पुढे म्हणाली की, “मी लहानाची मोठी मुंबईतच झाले आहे. विशेषतः दक्षिण मुंबईत मला नेहमी सुरक्षित वाटायचं. पण इतक्या वर्षांत पहिल्यांदाच मला दिवसाढवळ्या, माझ्या गाडीत बसूनदेखील असुरक्षित वाटलं. माझ्यासोबत मित्र होता म्हणून मी नशिबवान होते, पण मी एकटी असते तर काय झालं असतं, याचा विचार करूनच अंगावर शहारे आले.” तिने व्हिडीओ काढण्याचा विचार केला होता, पण त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा उन्माद वाढेल या भीतीने तिने व्हिडीओ न करण्याचं ठरवलं. पोस्ट का डिलीट केली या संपूर्ण अनुभवावरून सुमोनाने सरकार आणि नागरिकांची जबाबदारी अधोरेखित केली होती. “आपल्या स्वतःच्या शहरात सुरक्षित वाटण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आंदोलन शांततेत होऊ शकतं, पण इथे पूर्ण अराजकतेचं चित्र होतं,” असं ती म्हणाली होती. तथापि, तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी तिच्या धाडसी वक्तव्याचं समर्थन केलं तर काहींनी आंदोलनाबाबत नकारात्मक बोलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. वाढत्या चर्चेमुळे अखेर सुमोनाने काही तासांतच ती पोस्ट डिलीट केली.