Gunaratna Sadavarte : डंके की चोट पे.! गुणरत्न सदावर्तें आहेत तरी कोण? मराठा आरक्षणाला इतका विरोध का करतात? वाचा..

मुंबई : सध्या राज्यात मराठा आणि OBC आरक्षणावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयात (हायकोर्ट) सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत याचिकाकर्त्यांतर्फे युक्तिवाद करणारे वकील गुणरत्न सदावर्ते हे एक महत्वाचे नाव आहे.
गुणरत्न सदावर्ते हे वकील आहेत. ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ओबीसी कोट्यात समावेश करण्याच्या विरोधात सक्रिय भूमिका घेत आहेत. त्यांच्या भूमिकेमुळे मराठा-ओबीसी संघर्ष अधिक तीव्र झाला असून, राज्यातील सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आज (१ सप्टेंबर) हायकोर्टातील तातडीच्या सुनावणीत सदावर्ते यांनी सरकारला चांगलेच घेरलं असून, आंदोलनाच्या कायदेशीरतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कोण आहेत गुणरत्न सदावर्ते?
अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेडचे आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) आणि मुंबईतून झालं आहे. विविध सामाजिक चळवळींमध्ये ते नेहमीच पुढे असायचे. त्यांनी नांदेडला ‘सम्यक विद्यार्थी आंदोलन’ ही संघटना सुरू करुन या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले होते
ते मुंबई उच्च न्यायालयात सरकारी पक्षाचे विशेष लोक अभियोक्ता (स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर) म्हणून कार्यरत आहेत. विशेषतः, २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात त्यांनी सरकारी बाजू मांडली होती. यामुळे त्यांना राज्यव्यापी ओळख मिळाली.
सदावर्ते यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी केली आहे. मॅटच्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले आहेत. ते बार कॉऊंसिलच्या शिखर परिषदेवर देखील होते. मराठा आरक्षण असंवैधानिक असल्याची याचिका न्यायालयात दाखल करणाऱ्या अॅड. जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. त्यांना झेन नावाची मुलगी आहे.
22 ऑगस्ट 2018 रोजी परळच्या क्रिस्टल प्लाझा या इमारतीला आग लागली होती. त्यावेळी दहा वर्षाच्या झेन सदावर्ते हिने तिथे अडकलेल्या लोकांना सावधगिरीचे उपाय सुचवले. त्यामुळे 17 जणांचे प्राण वाचले होते. तिच्या या कार्याबद्दल तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे.
सदावर्ते हे मराठवाडा आणि विदर्भ भागातील ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये गणले जातात. त्यांच्या वकील म्हणूनच्या भूमिकेमुळे ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात अनेक महत्वाच्या प्रकरणांमध्ये सहभागी झाले आहेत. ओबीसी समाजाच्या संघटनांशी त्यांचा जवळचा संबंध आहे, आणि ते ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी नेहमीच आघाडीवर असतात.
मराठा आरक्षणाला का करतात विरोध?
गुणरत्न सदावर्ते हे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या विरोधात आहेत, कारण त्यांच्या मते हे ओबीसी समाजाच्या हक्कांवर अतिक्रमण करेल. सध्या सुरू असलेल्या मुंबई हायकोर्टातील सुनावणीत सदावर्ते यांनी एमी फाउंडेशनच्या याचिकेतर्फे युक्तिवाद केला आहे.
त्यांनी सांगितलं की, मराठा आंदोलनामुळे मुंबईतील सामान्य नागरिक, विशेषतः सीएसएमटी परिसरातील रुग्णालये, कार्यालये आणि महिलांना त्रास होतोय. “सीएसएमटी हा संवेदनशील भाग आहे. येथे महत्वाची कार्यालये, रुग्णालये आहेत. आंदोलनामुळे सामान्यांना प्रचंड त्रास होतोय,” असं सदावर्ते यांनी कोर्टात म्हटलं.
ओबीसी कोट्यावर अतिक्रमण
मराठा समाजाला ओबीसी कोट्यात समाविष्ट केल्यास ओबीसी समाजाच्या ५२% आरक्षणावर परिणाम होईल. सदावर्ते यांनी स्पष्ट केलं की, मराठा आणि कुणबी (ओबीसी उपजात) वेगळे आहेत. कलेलकर आयोग, मंडल आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मराठ्यांना ओबीसीत समाविष्ट करता येत नाही. “बोगस कुणबी प्रमाणपत्रांद्वारे शिरकाव करून ओबीसी कोटा हिरावला जाईल,” असा सदावर्ते यांचा आरोप आहे.
2018 मध्ये गुणवरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला
मराठा आरक्षणाच्या सुनावनीनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या बाहेर सदावर्ते यांच्यावर 10 डिसेंबर 2018 ला हल्ला करण्यात आला होता. मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेच्या सुनावणीच्या कामाकाजाबद्दल सदावर्ते माध्यमांना माहिती देत होते. त्यानंतर सदावर्ते परतण्यासाठी निघाल्यावर एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत वैजनाथ पाटील नावाच्या व्यक्तीने सदावर्ते यांच्यावर हल्ला केला होता.





