Sudan : सुदानमधील निमलष्करी दलाने स्थापन केले समांतर सरकार

कैरो : सुदानमधील निमलष्करी दलाने देशात समांतर सरकार स्थापन केल्याची घोषणा केली आहे. रॅपिड सपोर्ट फोर्स या निमलष्करी दलाचा ताबा देशाच्या पश्चिमेकडील दारफूर भागात आहे, त्या भागासाठी हे समांतर सरकार स्थापन करण्यात आले आहे. रॅपिड सपोर्ट फोर्सच्या नेतृत्वाखालील तासिस अलायन्स या युतीचे प्रवक्ते अला अल-दीन नकद यांनी न्याला येथील दारफूर शहरातून एका व्हिडिओ निवेदनात नवीन प्रशासनाची घोषणा केली.
दारफूर भागात मोठ्या प्रमाणावर युद्धगुन्हे झाल्याचा आणि मानवतेविरुद्धचे गुन्हे झाल्याचा आरोप असून या आरोपांचा तपास देखील केला जातो आहे. आरएसएफने केलेल्या या घोषणेमुळे सुदानमधील लष्कर आणि निमलष्करी दलामध्ये असलेला तणाव आणखी वाढण्याची भीती आहे. दोन्ही सुरक्षा दलांमध्ये एप्रिल २०२३ पासून राजधानी खार्तुम आणि देशाच्या अन्य भागांमध्ये संघर्ष सुरू आहे.
आरएसएफचे कमांडर असलेल्या जनरल मोहमद हमदान दागालो यांना सार्वभौम परिषदेचे नवीन प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. या परिषदेमध्ये १५ सदस्य असून ही परिषद देशाची प्रमुख असणार आहे. २०१९ मध्ये झालेल्या बंडामध्ये अल-बशीर यांचे सरकार उलथवून टाकले गेले होते. त्यांच्या नंतर लष्करी राजवटीतील सार्वभौम परिषदेतील सदस्य मोहमेद हसन अल ताशी यांना पंतप्रधान करण्यात आले आहे.
आरएसएफची उत्पत्ती सशस्त्र गटातून
आरएसएफची उत्पत्ती जांजवीद या सशस्त्र गटातूनच झाली आहे. दोन दशकांपुर्वी सुदानचे अध्यक्ष असलेल्या ओमल अल-बशीर यांच्या प्रेरणेतून दारफूरमधील सेंट्रल किंवा पूर्व आफ्रिकन लोकसंख्येविरोधात या सशस्त्र गटाची निर्मिती झाली होती. जांजवीद गटावर या गटावर सामूहिक हत्याकांड, बलात्कार आणि अन्य अत्याचार केल्याचे आरोप होते. सध्या सुरू असलेल्या संघर्षामध्ये आरएसएफने देखील स्थानिक जनतेवर अनेक अत्याचार केल्याचा आरोप आहे. अमेरिकेचे तत्कालिन अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने दागालो यांच्यावर वांशिक हत्याकांडाचे आरोप करून निर्बंध घातले आहेत. मात्र एरएसएफने हे आरोप फेटाळून लावले आहेत.





