Nile River : नाईल नदी पाणी वाटप प्रकरणी ट्रम्प यांची मध्यस्थीची तयारी; इजिप्त आणि सुदानने केले स्वागत

कैरो : नाईल नदीवर इथिओपियाने बांधलेल्या विशाल धरणामुळे उद्भवलेल्या पाणी वाटप तंट्यामध्ये मध्यस्थी पुन्हा सुरू करण्याची तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखवली आहे. त्यांच्या या भूमिकेचे इजिप्त आणि सुदानने स्वागत केले आहे. इथिओपियाने नाईल नदीवर बांधलेल्या ग्रँड इथिओपियन रेनेसान्स डॅम नावाचे विशाल धरणाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे.
या धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून ५ हजार मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. यामुळे इथिओपियाची वीजनिर्मिती दुपटीने वाढणार आहे. मात्र या धरणामुळे नाईल नदीच्या पाण्याच्या प्रवाहावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा करत हे धरण म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप इजिप्तने केला आहे. नाईल खोऱ्यातील देशांच्या हितासाठी आणि कोणाचेही नुकसान न होऊ देता समान हितसंबंध साधण्यासाठी आपला धरणाला विरोध असल्याचे इजिप्तचे अध्यक्ष अब्देल अल-सिसी यांनी म्हटले आहे.
तर या मुद्द्यावर सकारात्मक तोडगा काढला जावा, यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी करणे आवश्यक असल्याचे सुदानमधील सत्तारुढ सॉव्हरिन कौन्सिलचे अध्यक्ष आणि लष्कर प्रमुख जनरल अब्देल-फतेह बुरहान यांनीही म्हटले आहे. मात्र इथिओपियाकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.





