Sudan Landslide : सुदानमध्ये दरडी कोसळल्याने अख्खे गाव नष्ट; तब्बल एक हजार जण ठार झाले

Sudan Landslide – सुदनाच्या पश्चिमेकडील दारफूर भागात भूस्खलनामुळे तब्बल एक हजार जण ठार झाले आहेत. मध्य दारफूरच्या मराह डोंगररांगांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या अखेरपासून मुसळधार पास सुरू आहे. यामुळे या भागात मोठे भूस्खलन झाले आहे. डोंगराचा मोठा भाग एका गावावर कोसळल्याने अख्खे गाव गाडले गेले आहे. प्राथमिक माहितीनुसार या गावातील बहुतेक सर्वजण ठार झाले आहेत.
मृतांची संख्या एक हजारच्यापुढे असल्याचा अंदाज आहे. या गावातील केवळ एक जण या आपत्तीमध्ये बचावला आहे, असे दारफूर भागावर नियंत्रण असलेल्या सुदान लिबरेशन मुव्हमेंट आर्मीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सुदानमधील नैसर्गिक आपत्तीच्या इतिहासातली ही आतापर्यंतची सर्वात भीषण आपत्ती ठरली आहे.
भूस्खलनामध्ये संपूर्ण गाव गाडले गेले आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मदत संघटनांनी तातडीने मदत करावी, असे आवाहन बंडखोरांच्या गटाने केले आहे. डोंगररांगांमधील मोठा भाग तुटून गावावर कोसळल्याने गाव गाडले गेल्याचे स्थानिक वृत्तवाहिनीच्या व्हिडीओमध्ये दिसते आहे.
दारफूर हा पर्वतरांगांमधील अल-फशेर या भागात लष्कर आणि निमलष्कराचा जोरदार संघर्ष सुरू असतो. तेथपासून नैऋत्येला १६० किलोमीटरपर्यंत ज्वालामुखी प्रवण क्षेत्र देखील आहे. युद्धामुळे विस्थापित झालेल्या लोकांनी याच भागात आश्रय घेतला आहे. लष्कर आणि निमलष्करी दलाच्या युद्धात आतापर्यंत ४० हजार लोक ठार झाले आहेत.
तर १४ दशलक्ष लोकांना पलायन करावे लागले आहे. प्रचंड दुष्काळ पडल्याने लोकांवर गवत खाण्याची वेळ आली आहे. लष्कराच्या दोन संघटनांमधील युद्धात सामान्य जनता भरडली गेली असून वांशिक नरसंहार, बलात्कार आणि सामूहिक हत्यांसारख्या शेकडो घटना या परिसरात घडल्या आहेत. रविवारी झालेले भूस्खलन हे सुदानच्या अलीकडील इतिहासातील सर्वात घातक नैसर्गिक आपत्तींपैकी एक होते. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या हंगामी पावसात दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होत असतो.
यादवी संघर्षामुळे मदत पोचवणे अवघड
सुदानमध्ये २०२३ पासून यादवी युद्ध सुरू आहे. देशातील लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्स या निमलष्करी दलामध्ये हा संघर्ष सुरू आहे. त्याच दरम्यान ही भीषण नैसर्गिक आपत्ती उद्भवली आहे. राजधानी खारतौम आणि देशाच्या अन्य शहरांमध्ये उघड-उघड युद्धजन्य परिस्थिती आहे. भूस्खलन झालेला दारफूर हा भाग मराह पर्वतरांगांमध्ये येतो.
या भागात सुरू असलेल्या हिंसाचार आणि संघर्षामुळे संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मदत गटांना संपर्क साधणे दुरापस्त आहे. सुदानमध्ये एकापेक्षा अधिक बंडखोर गट देखील सक्रिय आहेत. सुदान लिबरेशन आर्मी हा त्यापैकी एक आणखी एक गट असून तो दारफूर आणि कोरदोफान भागातल्या माराह पर्वतरांगांमध्ये सक्रिय आहे. मात्र या गटाने लष्कर किंवा आरएएफ या दोन्हीपैकी कोणाचीही बाजू घेतलेली नाही.





