अफगाणिस्तान, म्यानमार, इराणसह ‘या’ १२ देशांतील लोकांना अमेरिकेत प्रवेशबंदी ; जाणून घ्या नेमकं कारण

US bans 12 country citizens। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका नवीन घोषणेवर स्वाक्षरी केली आहे, ज्या अंतर्गत त्यांनी १२ देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेशावर पूर्णपणे बंदी घातली आहे. यासोबतच, इतर ७ देशांमधून येणाऱ्या लोकांवर अंशतः निर्बंध लादण्यात आले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करत ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्यानेएका इंग्रजी वृत्तवाहिनीने ही माहिती दिली.
एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, ज्या १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यात अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन यांचा समावेश आहे. या देशांचे नागरिक आता अमेरिकेत प्रवेश करू शकणार नाहीत. ही बंदी सोमवारी रात्री १२:०१ वाजल्यापासून लागू होणार आहे.
या ७ देशांवरही अंशतः बंदी US bans 12 country citizens।
याशिवाय ट्रम्प यांनी इतर ७ देशांमधून येणाऱ्या लोकांवरही निर्बंध लादले आहेत. यामध्ये बुरुंडी, क्युबा, लाओस, सिएरा लिओन, टोगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला यांचा समावेश आहे. आता या देशांमधून येणाऱ्या लोकांवर विशेष अटी आणि कडक तपासणी लागू होईल.मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी असे धोरण स्वीकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांच्या पहिल्या राष्ट्रपती कार्यकाळात, त्यांनी ७ मुस्लिम बहुल देशांमधून प्रवास बंदी घातली, जी नंतर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली.
ट्रम्प यांनी या निर्णयाचे कारण स्पष्ट केले
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात, अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचे आणि माझ्या नागरिकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मला हे पाऊल उचलावे लागले आहे.” असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, “आम्ही पुन्हा एकदा प्रवास बंदी लागू करू, ज्याला काही लोक ‘ट्रम्प ट्रॅव्हल बॅन’ म्हणतात, जेणेकरून कट्टरपंथी इस्लामिक दहशतवाद्यांना देशात प्रवेश करण्यापासून रोखता येईल. हा एक असा निर्णय जो सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केला.” असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
सुरक्षा तपासणीत अपयशी ठरलेल्या देशांवर निर्बंध
व्हाईट हाऊसने म्हटले आहे की ज्या देशांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे ते स्क्रीनिंग आणि सुरक्षा तपासणीत अपयशी ठरले आहे. त्यामुळे त्यांना अमेरिकेसाठी गंभीर धोका मानले जाते. हे पाऊल ट्रम्प यांच्या धोरणाचा विस्तार आहे, जे त्यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात (२०१७) सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी ७ मुस्लिम बहुल देशांच्या (इराक, सीरिया, इराण, सुदान, लिबिया, सोमालिया, येमेन) नागरिकांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अबीगेल जॅक्सन यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प धोकादायक परदेशी घटकांपासून अमेरिकन लोकांचे संरक्षण करण्याचे त्यांचे वचन पाळत आहेत.
अनेक व्हिसा श्रेणींवर बंदी US bans 12 country citizens।
ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांचे प्रवास बंदी धोरण परत आणले आहे आणि ते अधिक व्यापक केले आहे. यावेळी, हे निर्बंध केवळ स्थलांतरित व्हिसासाठीच नव्हे तर बी-१ (व्यवसाय), बी-२ (पर्यटन), एफ (विद्यार्थी), एम (व्यावसायिक) आणि जे (एक्सचेंज प्रोग्राम) सारख्या नॉन-इमिग्रंट व्हिसासाठी देखील लागू असतील. हे उपाय अशा देशांवर केंद्रित आहेत ज्यांचे व्हिसा ओव्हरस्टे दर जास्त आहेत किंवा जे अमेरिकन कायदा अंमलबजावणी संस्थांना योग्यरित्या सहकार्य करत नाहीत.
कोणत्या कारणांसाठी निर्बंध लादण्यात आले?
* तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला
* इराण आणि क्युबामध्ये राज्य-पुरस्कृत दहशतवाद
* चाडमध्ये B1/B2 व्हिसासाठी ओव्हरस्टे दर 49.54%
* इरिट्रियामध्ये एफ, एम आणि जे व्हिसा धारकांसाठी ओव्हरस्टे दर ५५.४३% आहे.





