सुदानमध्ये लष्करी विमान कोसळून ४८ ठार; आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहीती

कैरो – सुदानच्या ओमडुरमन शहरात लष्कराचे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये ४८ जण ठार झाले. लष्करी आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहीती दिली. राजधानी खार्तुमच्या शेजारीच असलेल्या ओमडुरमन शहराच्या उत्तरेकडील वाडी सायिदना एअरबेसवरून उड्डाण घेत असतानाच हे विमान कोसळले.
या दुर्घटनेमध्ये लष्करी अधिकाऱी आणि सामान्य नागरिकही ठार झाले, असे सुदानच्या लष्कराने म्हटले आहे. मात्र ठार झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. लष्करी सूत्रांनी तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले.
तथापि या अपघातात किमान ४८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह ओमडुरमनमधील नौ येथे हलवण्यात आले आहेत. रुग्णालयात दोन तरुण भावंडांसह पाच जखमी नागरिक देखील दाखल झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
सुदानमध्ये २०२३ पासून यादवी युद्धाची स्थिती आहे. ससुदानचे लष्कर आणि रॅपीड सपोर्ट फोर्स या निमलष्करी दलामध्ये सुरक्षा दलावरील वर्चस्वाचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षातून सुदानच्या शहरी भागात सुरक्षा दलांकडून लुटालूट, जाळपोळ आणि बलात्कारासारखे गुन्हे केले जात आहेत, असे निरीक्षण संयुक्त राष्ट्राने नोंदवले आहे.





