Nityanand Rai : देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (Nityanand Rai) मनुष्यबळाची मोठी कमतरता असल्याचे वास्तव समोर आले आहे. केंद्र सरकारने बुधवारी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफ, बीएसएफ आणि सीआयएसएफसह विविध दलांमध्ये मिळून ९३,००० पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही आकडेवारी सादर केली. या अधिकृत आकडेवारीनुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) सर्वाधिक २८,३४२ पदे रिक्त आहेत, तर केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) २७,४०० जागा भरल्या गेलेल्या नाहीत. सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) १४,५३१, भारत-तिबेट सीमा पोलिसात (आयटीबीपी) १२,३३३, सशस्त्र सीमा बलमध्ये (एसएसबी) ६,७८४ आणि आसाम रायफल्समध्ये ३,७४९ पदे रिक्त आहेत. अशा प्रकारे एकूण ९३,१३९ पदे भरण्याची प्रतीक्षा आहे. ही रिक्त पदे कायदा सुव्यवस्था आणि आपत्ती व्यवस्थापनावर परिणाम करत असल्याच्या चर्चेवर बोलताना मंत्र्यांनी स्पष्ट केले की, उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करून ही दले आपले कर्तव्य चोख बजावत आहेत. रिक्त पदे भरण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. यूपीएससी आणि एसएससी यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया निरंतर सुरू असते. भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी कॉन्स्टेबल पदांसाठी वार्षिक भरती, नोडल फोर्सची नियुक्ती आणि शारीरिक चाचणीसाठी आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर यांसारखी पावले उचलण्यात आली आहेत. इतकेच नव्हे तर, वैद्यकीय चाचणीसाठी लागणारा वेळ कमी करून आणि काही श्रेणींमधील कट-ऑफ गुण कमी करून जास्तीत जास्त उमेदवारांची निवड करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. दुसरीकडे, जवानांच्या राजीनाम्याचे वाढते प्रमाण चिंतेची बाब ठरत आहे. २०२१ मध्ये १,२५५ जवानांनी राजीनामा दिला होता, ती संख्या २०२५ मध्ये वाढून २,३३३ वर पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे जवानांमधील आत्महत्या, आपापसातील संघर्ष (फ्रॅट्रिसाईड) आणि स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. २०२१ मध्ये १०,८२८ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती, २०२५ मध्ये हा आकडा ४,२९१ पर्यंत खाली आला आहे.