Pune District : कपर्दिकेश्वर यात्रा परिसरात विद्यार्थ्यांचे श्रमदान
Pune District : श्रमदानातून परिसराची स्वच्छता करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश दिला.

ओतूर : कपर्दिकेश्वर मंदिर यात्रा व तिसरा श्रावणी सोमवारनिमित्त अण्णासाहेब वाघिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, ओतूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने यात्रा परिसरात प्लास्टिक संकलन व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेच्या 87 स्वयंसेवकांनी श्रमदान करीत तब्बल 13 ट्रॉली प्लास्टिक कचरा संकलित करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली.
यात्रेनिमित्त कपर्दिकेश्वर मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असल्याने प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, खाद्यपदार्थांचे वेष्टन तसेच अन्य घनकचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. या कचर्यामुळे पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. स्वयंसेवकांनी यात्रा परिसरात फिरून प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टने आणि अन्य कचरा संकलित केला. श्रमदानातून परिसराची स्वच्छता करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुवर्णा डुंबरे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करण्याचे कार्य केले जाते. समाजाप्रती आपलेही काहीतरी उत्तरदायित्व आहे, ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजणे आवश्यक असून, पर्यावरणाचे संतुलन राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश शिरसाट यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. कल्याण सोनावणे, ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. वसंत गावडे, डॉ. राजेश रसाळ, डॉ. किशोर काळदंते, हेमंत डुंबरे पाटील आदी उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. विनायक कुंडलिक आणि शिक्षकेतर कर्मचारी निखिल काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले. आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. राजेंद्र आंबवणे यांनी मानले.





