Pune District : जुन्नर तालुक्यात खरिपाची पिके जळू लागली
Pune District : खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

बेल्हे : ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर उजाडला तरी पावसाने प्रदीर्घ दडी मारल्याने जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी कोवळी खरीप पिके शेतातच करपू लागली असून, ऐन फुलोर्यात आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत पिकांना पाण्याचा मोठा खंड पडल्याने हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आणे, पेमदरा, नळवणे आणि शिंदेवाडी परिसरातील शेतकर्यांमध्ये त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.
तालुक्यातील अनेक भागांत बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद आणि मका या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. कडक उन्हामुळे पिकांनी माना टाकल्या असून, जमिनीला मोठे तडे गेले आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांचा पेरणीपासून मशागतीपर्यंतचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खरीप हंगामातील महत्त्वाच्या पिकांना सध्या पाण्याची अत्यंत गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. काही भागांत पिकांची वाढ खुंटली असून, काही ठिकाणी पिके करपू लागली आहेत. ढगाळ वातावरण निर्माण होते; मात्र पावसाच्या सरी हुलकावणी देऊन जात असल्याचे चित्र आहे. पावसाअभावी पिकांवर किडींचा प्रादुर्भावही वाढत असल्याने शेतकर्यांना वारंवार औषधांची फवारणी करावी लागत आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकर्यांच्या उत्पादन खर्चात आणखी वाढ झाली आहे.
पावसाच्या खंडाचा परिणाम केवळ खरीप पिकांवरच झाला नसून, जनावरांसाठी उपलब्ध असलेला डोंगरावरील चारा सुकू लागला आहे. आगामी काळात पाऊस न झाल्यास चारा टंचाईचे संकट अधिक तीव्र होण्याची भीती पशुपालकांकडून व्यक्त होत आहे.
चारा टंचाईचे मोठे संकट आता पशुपालकांसमोर उभे राहिले आहे. संपूर्ण वर्षाच्या उत्पन्नाची भिस्त खरिपावरच असते. शासनाने शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून या भागाला दुष्काळग्रस्त घोषित करावे आणि विमा कंपन्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत.
-प्रियंका दाते, सरपंच, आणेपेमदरा गावात पावसावर अवलंबून शेती आहे. पावसाअभावी पिके जळू लागली आहेत. बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. कृषी आणि महसूल विभागाने संयुक्तपणे शिवारात उतरून पिकांची पाहणी करून नुकसानीचा पंचनामा करावा.
-जयश्री गाडेकर, सरपंच पेमदरा





