Pune District : भटके विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील – शिवाजी मांदळे
Pune District : ब्रिटिशांनी 1871 मध्ये लागू केलेल्या क्रिमिनल ट्राईब्स अॅक्ट या जुलमी कायद्यामुळे अनेक भटक्या व विमुक्त जमातींना जन्मजात गुन्हेगार ठरविण्यात आले होते.

राजगुरुनगर : विमुक्त जाती व भटक्या जमातीतील समाजबांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. भटके-विमुक्त समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप खेड तालुका मंडल अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी केले.
विमुक्त जाती, भटक्या जमाती समाज जोडो अभियानांतर्गत राजगुरुनगर येथे 31 ऑगस्ट रोजी भटके-विमुक्त दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजाच्या संघर्षमय इतिहासाला उजाळा देत पूर्वजांच्या बलिदानाला अभिवादन करण्यात आले. ब्रिटिशांनी 1871 मध्ये लागू केलेल्या क्रिमिनल ट्राईब्स अॅक्ट या जुलमी कायद्यामुळे अनेक भटक्या व विमुक्त जमातींना जन्मजात गुन्हेगार ठरविण्यात आले होते.
या अन्यायकारक कायद्याविरोधात समाजातील पूर्वजांनी उभारलेल्या ऐतिहासिक संघर्षाचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाला यावेळी नमन करण्यात आले. भटके-विमुक्त दिनाचे औचित्य साधून खेड तालुक्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील समाजबांधवांना जातीचे दाखले वितरित करण्यात आले. भाजप खेड तालुका मंडल अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या हस्ते या दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळी आमदार बाबाजी काळे, विमुक्त जाती व भटक्या जमाती राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय कदम, खेड तालुका अध्यक्ष विकास वायकर, ज्ञानेश्वर वायकर, बंडोपंत टेंबे, विकास शितोळे, राजू भोसले, दादा भोसले, महेश वायकर, अनिल वायकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार बाबाजी काळे व विमुक्त जाती, भटक्या जमाती राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय कदम यांनी मनोगत व्यक्त केले.





