शिक्षण व्यवस्था बळकटीलाच अधिक प्राधान्य – शिक्षण आयुक्त सूरज मांढरे

पुणे :- शिक्षक भरती मधील वेळोवेळी आलेल्या अनंत अडचणी दूर करून शिक्षक भरतीची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. बहुतांश जिल्हा परिषदेच्या व बऱ्याच खाजगी संस्थेच्या जाहिराती आता प्रसिद्ध होत आहेत. ही भरती करत असताना युवकांना नोकरी देणे हा प्राथमिक हेतू नसून शिक्षण व्यवस्था बळकट होणे व पुढील पंचवीस वर्षासाठी सुयोग्य प्रकारचे सुयोग्य शिक्षक मिळणे हा हेतू विचारात घेऊन शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
इंग्रजी माध्यमातून अर्हता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुर्वी २० टक्के जागा राखून ठेवलेल्या असत. त्या नंतर ते प्रमाण रद्द करून उलट गरजेप्रमाणे ते घ्यावेत अशी मुभा शासन निर्णयाने दिलेली आहे. इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालेले म्हणजे केवळ अर्हता पदवी मिळालेले इतका मर्यादित अर्थ दुरुस्त करून उलट ज्यांचे शिक्षण पूर्ण इंग्रजी माध्यमात झाले आहे व जे एससीआरटी द्वारे घेतली जाणारी इंग्रजीची पात्रता परीक्षा पास होतील अशा इंग्रजीमध्ये उत्तम जाण असणाऱ्या शिक्षकांची भरती मूळच्या २० टक्के प्रमाणापेक्षा सुद्धा काही कमी प्रमाणात केली जात आहे. याद्वारे गरीब कुटुंबातील मुलांना देखील चांगले इंग्रजीचे शिक्षण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातून मिळेल. हे शिक्षक सुद्धा परदेशातून येणारे नसून ते सुद्धा मराठीच माणसे आहेत. शिवाय मराठीतून अर्हता प्राप्त झालेल्या शिक्षक भरती होणाऱ्यांचे प्रमाण ८० टक्के पेक्षाही जास्त असणार आहे.
दरम्यान काही बाबींचा अवाजवी विपर्यास काही मंडळी करीत असून केवळ स्वतःला नोकरी मिळवणे या मर्यादित हेतूने भूमिका घेत असुन ही भुमिका समर्थनीय नाही, असे मांढरे यांनी नमुद केले आहे.
pune news : सासवडच्या शिरोपेचात मानाचा तुरा; स्वच्छ सर्वेक्षणात सलग दुसर्या वर्षी पुरस्कार !
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची इंग्रजीची व इंग्रजी संभाषण कौशल्याची गरज जर पूर्ण करू शकलो नाही तर अनेक विद्यार्थी त्यांच्या पालकांची क्षमता नसताना खाजगी शाळांमध्ये जातील, नव्हे जात आहेत. दूरगामी परिणाम म्हणून अनेक संधींनाही ते मुकतील. त्याचप्रमाणे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षण देणे जरी प्राधान्याचे असले तरी अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून त्रिभाषा सूत्र याच धोरणाने स्वीकारलेले आहे. आंतरराष्ट्रीय संधी अथवा आंतरराज्य संधी घ्यायच्या असतील तर या भाषा अवगत असणे हे लहानपणापासून करावयाची प्रक्रिया असल्यामुळे या भाषेत पारंगत शिक्षकांची नितांत आवश्यकता आहे, असे मांढरे यांनी सांगितले आहे.





