काबूल – अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानकडून कहर सुरुच आहे. अफगाणमधील महिलांना तालिबान्यांची भीती वाटत आहे. यापुर्वी देखील तालिबान्यांनी अफगाण महिलेवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे अनेकजण अफगाणिस्तानातून पळून जात आहेत.
तालिबानने कुटुंबातील पुरुष सदस्य सोबत नसलेल्या महिलांच्या प्रवासाला बंदी घातली आहे. दरम्यान, काबूल विमानतळाच्या बाहेरच अनेक स्त्रियांना लग्नासाठी भाग पाडले जात आहे. जेणेकरून त्यांना वाचवले जाईल, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.
सीएनएनच्या एका अहवालात अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने या प्रवृत्तीवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील एका बचाव केंद्रात असे आढळून आले की, अफगाण महिलांच्या काही कुटुंबांनी त्यांना तालिबानपासून वाचण्यासाठी लग्न करण्यास भाग पाडले.
कुटुंबांनी काही मुलांना त्यांच्या मुलींसोबत लग्न करण्यासाठी पैसे देखील दिले. या मुलींचे लग्न अशा मुलांशी करण्यात आले, जे काबूल सोडण्यास पात्र आहेत. अफगाणांनी, विशेषत: महिलांसाठी घेतलेला हा निर्णय धक्कादायक आहे. त्यामुळे अफगाणी महिलांमध्ये निराशेचे वातावरण आहे. येथील महिलांना तालिबान्यांच्या हातून होणाऱ्या अत्याचाराची भीती वाटते.
मानवी तस्करीची शक्यता
सीएनएनच्या अहवालात म्हटले आहे की, अफगाण महिला मानवी तस्करींना बळी पडण्याची शक्यता असलेल्या काही प्रकरणांमध्ये अमेरिकेचे मुत्सद्दी अधिकारी संयुक्त अरब अमिरातीला मदत करण्याची शक्यता आहे. या बाबतीत ते होमलॅंड सुरक्षा आणि संरक्षण विभागाशी समन्वय साधतील, असे संकेत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिले आहेत.