Strait of Hormuz : होर्मूझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली होणार; पश्चिम आशियात शांततेची आशा वाढली
अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठीच्या शांतता करारावर रविवारी स्वाक्षऱ्या होणार आहेत आणि होर्मूझची सामुद्रधुनी तात्काळ सर्वांसाठी खुली होणार आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Strait of Hormuz – अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठीच्या शांतता करारावर रविवारी स्वाक्षऱ्या होणार आहेत आणि होर्मूझची सामुद्रधुनी तात्काळ सर्वांसाठी खुली होणार आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
शांतता कराराबाबत अमेरिका आमि इराणमधील वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून करारावर स्वाक्षऱ्या होणार असल्याचे पाकिस्तानने कालच म्हटले होते. त्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी आज (रविवारी) स्वाक्षऱ्या होतील, असे म्हटले आहे. मात्र स्वाक्षऱ्या होण्याच्या वेळापत्रकाबाबत इराणकडून कोणतीही टिप्पणी आलेली नाही.
शांतता करारावर स्वक्षऱ्या झाल्यानंतर लगेचच होर्मूझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली होईल, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेक महिन्यांचा संघर्ष आणि वाटाघाटींनंतरचे हे मोठे राजनैतिक यश आहे.
मात्र त्याच वेळी जर अपेक्षेप्रमाणे करार होऊ शकला नाही, तर नव्याने हल्ले करण्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
आम्हाला इराणबरोबर आणि संपूर्ण मध्यपूर्वेबरोबर मिळून भविष्यात दीर्घकाळापर्यंत काम करायचे आहे.
ही प्रक्रिया लवकरात लवकर, सहजपणे आणि सरळपणे पार पडेल अशी आशा आपल्याला वाटते आहे. जर तसे झाले नाही, तर आमच्याकडे अंतिम पर्याय आहे. पण त्या पर्यायाचा वापर करायची वेळ आमच्यावर येता कामा नये, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी अमेरिका-इराणमधील करारावर २४ तासात स्वाक्षऱ्या केल्या जातील, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले होते. पाकचे उपपंतप्रधान इशाक दार आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री युवराज फैजल बिन फरहान यांच्यात फोनवरून झालेल्या चर्चेनंतर शरीफ यांनी हे संकेत दिले होते.
करारावर दूरस्थ पद्धतीने स्वाक्षऱ्या झाल्यानंतर तांत्रिक चर्चेला सुरुवात होईल असे शरीफ यांनी म्हटले होते. इस्लामाबाद सामंजस्य करार कधी नव्हे इतका जवळ आला असल्याचे अराघची यांनीही शुक्रवारी म्हटले होते.
आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलासा…
वाटाघाटींसाठी सहकार्य केल्याबद्दल शरीफ यांनी अमेरिका आणि इराणला धन्यवादही दिले. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प, उपाध्यक्ष जेडी व्हान्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनाही टॅग केले. शरीफ यांनी शनिवारी कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी यांच्याशीही चर्चा केली.
उपपंतप्रधान इशाक दार यांनी युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार उच्च प्रतिनिधी काजा कॅलस, स्वित्झर्लंडचे परराष्ट्र मंत्री इग्नाझिओ कॅसिस, इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलट्टी आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्याशीही स्वतंत्रपणे फोनवर चर्चा केली.
२०१५ च्या करारापेक्षा वेगळा करार
शांतता करार २०१५ साली झालेल्या जॉइंट कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन ऑफ ऍक्शन या माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यककाळात झालेल्या करारापेक्षा वेगळा आहे.
ओबामा यांचा करार अण्वस्त्रे मिळवण्यासाठीचा खूपच सोपा, सुंदर, सरळ मार्ग होता, ही अण्वस्त्रे इराणने ६ वर्षांपुर्वीच मिळवली असती आणि वापरली देखील असती. आपला करार ओबामांच्या करारापेक्षा खूप वेगळा आहे.
हा करार म्हणजे अण्वस्त्रे मिळू नयेत म्हणून एक भिंत आहे. खरे तर इराणला अण्वस्त्रे नको आहे. त्यांना ती खरेदी करून, विकसित करून किंवा कोणत्याही मार्गाने मिळणारही नाहीत.
इराणचा अणू कार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला आहे. उर्वरित आण्विक सामुग्री नंतरच्या काळात नष्ट केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.





