केवळ एका जागेसाठी सरळ लढत

शिंदे वासुली (पुणे) – चाकण औद्योगिक वसाहतीतील वासुली (ता. खेड) येथील तरुणांनी गावाची सुत्रे हातात घेऊन सर्व तरुण सहकार्यांनी यशस्वी मध्यस्थी करत ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सात पैकी सहा सदस्य बिनविरोध निवडून आणले. फक्त एका जागेसाठी सरळ लढत होणार आहे.
वासुली ग्रामपंचायतीची मागील पंचवार्षिक निवडणूक मोठ्या चुरशीची झाली होती. यंदाही ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी तब्बल 26 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आणि त्यामुळे 2020-25 ची निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता वाटत होती. परंतु सोमवारी (दि.4) अर्ज माघारी घेण्याच्या दिवसाच्या शेवटच्या टप्प्यात वासुली येथील पोलीस पाटील अमोल पाचपुते, माजी उपसरपंच विनोद पाचपुते, मालक पाचपुते, सोमनाथ पाचपुते, गोरख पाचपुते, बबनराव पाचपुते यांनी ऐनवेळी मध्यस्थी केली. इच्छुक उमेदवारांचे मनपरिवर्तन करुन गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती करण्यात आली.
गावाच्या विकासासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत वॉर्ड क्र. 1 मधील 3 व वॉर्ड क्र. 2 मधील 2 असे एकूण 5 उमेदवारी अर्ज कायम ठेवून बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. तसेच यापूर्वी वॉर्ड क्र 3 मध्ये अनुसूचित जमातीमधून एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे सात सदस्य संख्या असलेल्या वासुली ग्रामपंचायत निवडणुकीत सहा सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.
वासुलीतील सहा सदस्य बिनविरोध तर एका जागेसाठी निवडणूक होणार आहे. संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक व्हायला हवी होती. एका जागेसाठी निवडणूक लागणे हि बाब निश्चितच भुषणावह नसल्याचे गावातील काही जाणकारांनी स्पष्ट केले. बिनविरोध निवड झालेल्या सहाही नवनिर्वाचित सदस्यांचे सर्व ग्रामस्थांनी स्वागत करुन सन्मान केला.
- वॉर्डनिहाय आरक्षणानुसार बिनविरोध सदस्य :
वॉर्ड 1 : सर्वसाधारण (खुला) – विक्रम पाचपुते, सर्वसाधारण स्त्री : मीरा दहातोंडे, नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री : कोमल पाचपुते. वॉर्ड क्र. 2 : नागरिकांचा मागासप्रवर्ग : दीपक लिंभोरे, सर्वसाधारण स्त्री : रविना शेळके. वॉर्ड क्र. 3 : अनुसूचित जमाती : अशोक गावडे. परंतु वॉर्ड तीनसाठी सरळ लढत होणार आहे.





