Pratap Sarnaik : “महागाई अशाच पद्धतीने वाढत राहिली, तर…”; परिवहन मंत्र्यांनी दिले मोठे संकेत
Pratap Sarnaik : देशात डिझेल दर वाढीचा मोठा फटका एसटी महामंडळाला देखील बसत आहे. डिझेल दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागणार असल्याची शक्यता दिसून येत आहे.

Pratap Sarnaik : सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दरवाढ केली जात आहे. आता चौथी दरवाढ करण्यात आल्याने मोठी झळ नागरिकांना सोसावी लागत आहे. डिझेलचे दर वाढते राहिले तर आगामी काळात मोठा निर्णय घ्यावे लागणार असल्याचे संकेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
डिझेलची पहिली वाढ १५ मे या दिवशी ३.१० पैशांनी झाली, त्यावेळी १२४ कोटी रुपयांचा खर्च वाढला. दुसरी वाढ ९३ पैशांनी झाल्यानंतर ३७.२० कोटी रुपयांचा खर्च वाढला. तिसरी वाढ ९१ पैशांनी झाल्यानंतर ३६.४० रुपयांनी खर्च वाढला. चौथी दरवाढ २.८१ पैशांनी झाल्यानंतर ११२.४० कोटी खर्च वाढला. आतापर्यंत झालेल्या दरवाढीमुळे एसटी महामंडळाचा डिझेलवरील खर्च तब्बल ३१० कोटी रुपयांनी वाढला असल्याची महत्वाची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.
देशात डिझेल दर वाढीचा मोठा फटका एसटी महामंडळाला देखील बसत आहे. डिझेल दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. महागाई अशाच पद्धतीने वाढत राहिली, तर एसटी महामंडळ जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणे अपरिहार्य ठरेल, असे विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
नेमकं काय म्हणाले सरनाईक?
देशात सातत्याने होत असलेल्या डिझेलच्या दरवाढीमुळे एसटी महामंडळावर आर्थिक संकट ओढवले आहे. महिन्याभरात दोनवेळा डिझेलचे दर वाढले असून, सध्या डिझेल ९१ रुपयांच्या पार गेले आहे. डिझेल प्रतिलिटर ३ रुपये १० पैशांनी महागल्यामुळे एसटी महामंडळावर वार्षिक सुमारे १२४ ते १२५ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
एसटी महामंडळ आधीच मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. एकट्या एप्रिल २०२६ या एका महिन्यात महामंडळाला जवळपास ७६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. महागाई अशाच पद्धतीने वाढत राहिली, तर एसटी महामंडळ जगवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणे अपरिहार्य ठरेल, असे सरनाईक यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सध्या तरी तातडीने कोणतीही तिकीट किंवा भाडेवाढ लागू केली जाणार नाही. मे महिन्यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या मदतीचा आढावा घेऊन पुढील निर्णय ठरवला जाईल, असे प्रवाशांना दिलासा देताना प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
महामंडळात येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक बसेस वाढवण्यावर भर दिला जात असून, राज्यातील प्रमुख २०० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर डिझेलचे दर असेच वाढत राहिले तर भाडेवाढ काही प्रमाणात करावी लागेल असेही ते म्हणाले.
परिवहन मंत्र्यांची घोषणा
पाच लिटर डिझेल बचतीच्या सूचना प्रत्येक आगारांना दिल्या आहेत. जे आगार जास्त डिझेल बचत करेल त्यांना बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली आहे.





