STP Project : शहरातील ६ सांडपाणी प्रकल्प बदलणार, खर्च १२२३ कोटी ; पण पालिकेचे ११० कोटी वाचले कसे? जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – केंद्रशासनाच्या ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत शहरातील जुन्या सहा मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांच्या (एसटीपी) नूतनीकरणाच्या तब्बल १,२२३ कोटी रुपयांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यावेळी उपस्थित होते.या प्रकल्पात दोन नवीन एसटीपी केंद्रांची उभारणी केली जाणार आहे, तर चार केंद्रांमध्ये अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांनुसार सांडपाणी शुद्ध करण्याचे काम होणार आहे.
त्यामुळे शुद्ध पाण्याची गुणवत्ता सुधारली जाणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले. या प्रकल्पासाठी आलेल्या निविदा सुमारे १५ टक्के अधिक दराच्या होत्या. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होण्याचे आरोप करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने सर्वात कमी दराची निविदा सादर केलेल्या विश्वराज एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी वाटाघाटी करून दर केवळ ३.६ टक्क्यांवर आणला. त्यामुळे महापालिकेची सुमारे ११० कोटी रुपयांची बचत झाल्याचा दावा आयुक्तांनी केला.
तसेच, या निविदा राज्यस्तरीय तांत्रिक समितीची प्रशासकीय मान्यतेनंतरच करार केला जाणार आहे.हा प्रकल्प ‘हॅम’ (Hybrid Annuity Model) पद्धतीने राबविला जाणार आहे. यामध्ये ६० टक्के निधी केंद्रशासनाकडून तर ४० टक्के निधी ठेकेदार कंपनीकडून उभारला जाणार आहे. या कंपनीने केलेल्या खर्चाची रक्कम महापालिकेकडून पुढील १५ वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने व्याजासह अदा करण्यात येणार असून त्यानुसार, भांडवली कामे, १५ वर्षे हे प्रकल्प चालविणे त्याची देखभाल दुरुस्ती करणे या सर्व कामांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. तो प्रत्यक्षात त्यापेक्षाही कमी असणार आहे. त्यात ठेकेदाराने गुंतविलेल्या रकमेसाठी द्यायच्या अंदाजित व्याजाचाही समावेश आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
असा आहे प्रकल्प..
सध्या महापालिकेकडून शहरात १० सांडपाणी प्रकल्प कार्यरत आहेत. त्यांची एकत्रित क्षमता ३६२ एमएलडी आहे. मात्र, हे प्रकल्प जुने असल्याने ५० टक्क्यांपेक्षा कमी क्षमतेने कार्यरत आहेत. तसेच, या प्रकल्पांमधून शुद्ध होणारे पाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नवीन मानकांनुसार नसल्यामुळे महापालिकेला दरवर्षी १०० कोटी रुपयांहून अधिक दंड भरावा लागत आहे. महापालिकेने ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत एसटीपींचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
या प्रकल्पामुळे शहरातील सांडपाणी शुद्धीकरण क्षमतेत ८९ एमएलडीने वाढ होणार आहे. त्यानुसार बहिरोबा सांडपाणी शुध्दीकरण केंद्र आणि नायडू सांडपाणी शुद्धीकरण केंद्राची पुनर्बांधणी केली जाणार असून नरवीर तानाजीवाडी केंद्र, बोपोडी केंद्र, एरंडवणा केंद्र तसेच विठठलवाडी केंद्राच्या शुद्धीकरण यंत्रणेचे नुतनीकरण केले जाणार आहे.
“विश्वराज इन्व्हायरमेंट कंपनीने १,३३२ कोटी रुपयांची निविदा सादर केली होती. त्यांनी ११० कोटी रुपयांनी दर कमी केल्याने निविदा पालिकेच्या अंदाजपत्रकापेक्षा सुमारे साडेतीन टक्के अधिक राहिली. पंधरा वर्षांच्या कालावधीचा विचार करता हे दर परवडणारे आहेत.”
– नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका





