पुणे : छत्रपती संभाजीनगर येथे AIMIM पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातही अशाच प्रकारची घटना घडल्याचे समोर आले आहे. पुण्यात महापालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा, रॅली, रोड शोचे आयोजन केले जात आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील काळेपडळ येथे प्रचार मोहिमत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या ताफ्यावर अज्ञातांनी हल्ला चढवला असल्याची घटना घडली आहे. या घटनेत भानगिरे यांच्या वाहनाचे नुकसान झाले असून, महिला उमेदवार सारिका पवार जखमी झाल्या आहेत. या घटनेनंतर राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. नाना भानगिरे आणि प्रभाग क्रमांक ४१ च्या उमेदवार सारिका पवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह काळेपडळ येथील मयूर जेएमएनएस सोसायटी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक काही समाजकंटकांनी त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या हल्ल्यात भानगिरे यांच्या कारची काच फुटली, तर एक दगड उमेदवार सारिका पवार यांना लागल्याने त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच काळेपडळ पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगााने फिरविण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलिसांकडून देण्यात आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासले जात असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या धामधूमीत अशा प्रकारची घटना घडल्याने शहरात चर्चा असून, या संदर्भातील तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होते अशी माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात बंदोबस्त वाढण्यात आला आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. हेही वाचा : मनसेचे मुख्यमंत्री फडणविसांना पत्र; ‘या’ तीन मागण्या करत म्हणाले, “सत्ता मिळवण्यासाठी…”