मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पक्षांतराचे सत्र सुरूच आहे. उमेदवारी न मिळाल्याने तसेच अंतर्गत नाराजीमुळे अनेक नेते आणि पदाधिकारी पक्ष बदलत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रचार सुरू झाल्यानंतरही ही घडामोड थांबलेली नसून, आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. अशातच मुंबईतील कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक 28 मधील हनुमान नगर येथील शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ठाकरे गटात दाखल झाले आहेत. या पक्षप्रवेशामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या महिला शाखा संघटक अश्विनी पवार, उपशाखाप्रमुख भरत पाटील, विनोद गुजर, विजय यादव, गणेश खंदारे, महेश शर्मा आणि सुधाकर पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांनी ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी विभागप्रमुख संतोष राणे, उपविभागप्रमुख प्रशांत कोकणे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. या घडामोडीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाची ताकद वाढल्याचे चित्र असून, शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.