State Ranking Table Tennis Tournament 2024 : नैशा रेवसकरला दुहेरी मुकुट..

छत्रपती संभाजीनगर – पुण्याची राष्ट्रीय खेळाडू नैशा रेवसकरने तिसऱ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील अनुक्रमे १५ व १७ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट मिळविला. मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात पुण्याच्या शौरेन सोमण यानेही विजेतेपद मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
मुलींच्या पंधरा वर्षाखालील गटात रेवसकर हिने अंतिम फेरीत नाशिकची द्वितीय मानांकित खेळाडू स्वरा करमरकर हिचा पराभव करीत आपले अग्रमानांकन सार्थ ठरविले. हा सामना तिने ११-९,११-४, १३-११ असा सरळ तीन गेम्स मध्ये जिंकताना काउंटर अटॅक पद्धतीचा बहारदार खेळ केला. पाठोपाठ सतरा वर्षाखालील गटाच्या अंतिम फेरीत तिने ठाण्याची पाचवी मानांकित खेळाडू रितिका माथुर हिचे आव्हान ९-११,११-७, ११-४,११-५ असे परतविले. पहिली गेम गमावल्यानंतर तिने सर्व्हिस व परतीचे फटके याच्यावर नियंत्रण ठेवीत विजय मिळविला.
मुलांच्या सतरा वर्षाखालील गटात सोमण याने अंतिम फेरीत अग्रमानांकित खेळाडू पार्थ मगर (मुंबई महानगर जिल्हा) याला पराभवाचा धक्का दिला. मात्र हा सामना जिंकताना त्याला खूपच संघर्ष करावा लागला. चुरशीने झालेला हा सामना त्याने ११-८,११-७,११-७,१०-१२,१२-१० असा जिंकला.
Duleep Trophy 2024-25 : मयंक अग्रवालच्या भारत-अ संघाने पटकावलं दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद….
मुलांच्या पंधरा वर्षाखालील गटात ठाण्याचा द्वितीय मानांकित खेळाडू मयुरेश सावंत याला विजेतेपद मिळाले अंतिम सामन्यात त्याने आपला सहकारी व अग्रमानांकित खेळाडू नीलय पाटेकर याचा ८-११,११-९, ११-४,७-११,११-७ असा पराभव केला. त्याने अष्टपैलू खेळाचा प्रत्यय घडविला.





