State Ranking Table Tennis Tournament 2024 : युवान वालिया, आद्या बाहेती ठरले विजेते…

State Ranking Table Tennis Tournament 2024 (संभाजीनगर) :- मुंबई महानगर जिल्ह्यांच्या युवान वालिया व परभणीच्या आद्या बाहेती यांनी अष्टपैलू खेळ करताना तिसऱ्या राज्य मानांकन टेबलटेनिस स्पर्धेत अनुक्रमे अकरा वर्षांखालील मुले व मुलीच्या गटाचे विजेतेपद पटकावले.
येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात झालेल्या मुलांच्या गटाच्या अंतिम फेरीत युवान (मुंबई महानगर जिल्हा) याने आलम सिद्दिकी (बीड) याची अनपेक्षित विजयाची मालिका खंडित केली. त्याने हा सामना ११-३, ८-११, ११-५, ११-५ असा जिंकला. मुलींच्या गटात आद्या हिने अजिंक्यपद पटकावित अव्वल मानांकन सार्थ ठरविले. मात्र अंतिम सामन्यात तिला जिनया वधान या ठाण्याच्या द्वितीय मानांकित खेळाडू विरुद्ध संघर्ष करावा लागला हा सामना तिने २-११,१२-१०,११-९,९-११,११-५ असा जिंकला.
मुलांच्या तेरा वर्षाखालील गटात टी एस टी मुंबई संघाच्या झैन शेख याने विजेतेपद मिळवित अग्रमानांकन सार्थ ठरविले. त्याला अंतिम सामन्यात त्याचाच सहकारी व द्वितीय मानांकित खेळाडू आरव व्होरा याने चुरशीची लढत दिली.
हा सामना शेख याने १०-१२,११-७,६-११,१३-११,११-५ असा जिंकला. मुलींच्या गटात अग्रमानांकित मायरा सांगळेकर या टीएसटी मुंबईच्या खेळाडूने सहज विजेतेपद पटकाविले. तिने अंतिम सामन्यात ठाण्याची खेळाडू धनश्री तरडे हिच्यावर ११-५,११-९,११-७ अशी मात करताना परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला.


