सातारा – जिल्ह्यातील एसटी सेवेला संपाचा फटका

सातारा – परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाचा जिल्ह्यातील एसटी सेवेला चांगलाच फटका बसला. एसटी सेवा अंशतः सेवा बाधित झाल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील 354 वाहनांच्या फेऱ्यांपैकी 138 फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. लांब पल्ल्यांच्या सेवा वगळता जिल्हांतर्गत व शहरी बसची चाके थांबल्याने प्रवासी सेवा ठप्प झाली.
परिणामी प्रवाशांना ताटकळावे लागले. कराड, वाई, दहिवडी या आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे लालपरी सकाळच्या सत्रात बाहेर पडू शकल्या नव्हत्या. या माहितीला एसटी विभागाच्या सूत्रांनी पुष्टी दिली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, जुलै 2018 ते जुलै 2024 यादरम्यानची प्रलंबित थकबाकी कर्मचाऱ्यांना देण्यात यावी, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतन दर याच्यामध्ये दरवर्षी प्रमाणित वृद्धी देण्यात यावी, राज्य शासनाच्यावतीने एसटी कर्मचाऱ्यांसाठी 4849 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले होते. मात्र, या रकमेचे पूर्ण वाटप झाले नाही, उरलेल्या रकमेचे कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीप्रमाणे वाटप करण्यात यावे, सेवा जेष्ठ कर्मचारी व नवीन सेवेत रूजू झालेले कर्मचारी या सर्वांना सरसकट पाच हजार रुपये वेतनवाढ देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी आजपासून राज्यस्तरीय संप पुकारला आहे
महायुती शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्याने एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी सातारा आगारातील कर्मचारी संघटनेच्या 100 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी एसटी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सात ऑगस्ट रोजी संयुक्त कृती समितीच्या सदस्यांची बैठक झाली होती. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले. या बैठकीला 11 दिवस उलटले म्हणून कामगार संघटनेने राज्यव्यापी संपाचे हत्यार छेडले आहे.
नोकरदारांसह विद्यार्थ्यांचे हाल
संपाची कल्पना नव्हती असा प्रवाशांना सातारा स्थानकातच अडकून पडावे लागले. नोकरदार, विद्यार्थी वर्गाचे प्रचंड हाल झाले. त्यामुळे त्यांना खासगी वाहनांचा आधार घेऊन सातारा- पुणे आणि सातारा जिल्हांतर्गत प्रवास करावा लागला. यामध्ये वडापवाल्यांची चांदी झाली. सातारा शहरातील बस सेवा, परळी आणि सातारा तालुक्याच्या ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सेवा ठप्प झाल्याने विद्यार्थी विद्यार्थिनींना शाळांना मुकावे लागले. सातारा आगाराच्या कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची भेट घेऊन त्यांना पुन्हा एकदा मागण्याचे निवेदन सादर केले.
३५४ पैकी १३८ फेऱ्या रद्द
सातारा आगारासह कराड, वाई, वडूज, दहिवडी, फलटण, खंडाळा या आगारांमध्ये सकाळच्या सत्रांमध्ये गाड्या बाहेर पडू शकल्या नाहीत. जिल्ह्यातील ३५४ फेऱ्यांपैकी 138 फेऱ्या रद्द झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये सातारा- वडूज, सातारा- दहिवडी, सातारा- गोंदवले, सातारा- वाई, सातारा- म्हसवड या सेवांना फटका बसला. सातारा- कोल्हापूर व सातारा- पुणे या सेवा मात्र सुरळीत सुरू असल्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात साताऱ्यावरून पुण्याला गेलेल्या गाड्या आगारातच रोखून धरण्यात आल्याने पुणे सातारा विना थांबा गाड्या ठप्प झाल्या होत्या.





