Nasrapur Case: वासनेपोटी चिमुरडीचा खून! आरोपीला कठोर शिक्षेची मागणी, ‘या’ तारखेला अंतिम निकाल
Nasrapur Case: गुन्हा करून पुरावे नष्ट करण्याचा केला प्रयत्न; आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि 'बॉडी लँग्वेज'चा न्यायालयात पर्दाफाश.

Nasrapur Case – नसरापूर येथे चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे हा पीडितेला दुपारी सुमारे सव्वातीन वाजता घटनास्थळाकडे घेऊन जाताना सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये दिसत आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजून ५१ मिनिटांनी तो घटनास्थळावरून एकटाच परतत असल्याचे सीसीटीव्हीमध्यै कैद झाले आहे. यावरून तब्बल ३९ मिनिटे चिमुरडी आरोपीच्या ताब्यात होती.
या ३९ मिनिटांच्या कालावधीत आरोपीने तिच्यावर पाशवी अत्याचार करून तिचा खून करीत मृतदेह लपवून ठेवला, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी केला. आरोपीने हे कृत्य रागाच्या भरात न करता, अतिशय थंड डोक्याने, विचारपूर्वक आणि केवळ वासनेपोटी केले आहे. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही अॅड. मिसर यांनी अंतिम युक्तिवादात केली.
दरम्यान २५ जून रोजी खटल्याचा निकाल लागणार आहे. शनिवारी (दि. २०) सरकारी पक्ष आणि बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद करण्यात आला. त्यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. मिसर यांनी सविस्तर युक्तिवाद केला. त्यांनी भक्कम पुरावे, तांत्रिक दस्तऐवज आणि वैद्यकीय अहवालांची मांडणी करीत आरोपपत्रातील सर्व आरोप सिद्ध केले.
आरोपीच्या खोटेपणाचा पर्दाफाश
काल (दि. १९) विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करताना हे आरोप फेटाळून लावले होते. दरम्यान, अॅड. मिसर यांनी सक्षम वैद्यकीय दाखले आणि डीएनए प्रोफाइलिंगच्या वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग निर्विवादपणे न्यायालयात सिद्ध केला. तसेच, पीडित मुलगी ३९ मिनिटे आरोपीच्या ताब्यात होती, या काळात त्याने केलेल्या क्रूरतेचा कळस न्यायालयासमोर मांडला.
पीडितेच्या मृत्यूनंतरही आरोपीने अत्यंत थंड डोक्याने तिच्या मृतदेहावर अत्याचार केले. घटनेनंतरची आरोपीची ‘बॉडी लँग्वेज’ (शारीरिक हावभाव), त्याचे वास्तव आणि त्याला यापूर्वीच्या खटल्यांमुळे असलेले कायद्याचे ज्ञान, याचा वापर त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी केल्याचे अॅड. मिसर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.





